esakal | होम आयसोलेशन नंतर टेस्टची गरज नाही; AIIMS च्या गुलेरियांनी सांगितलं कारण

बोलून बातमी शोधा

होम आयसोलेशन नंतर टेस्टची गरज नाही; AIIMS च्या गुलेरियांनी सांगितलं कारण
होम आयसोलेशन नंतर टेस्टची गरज नाही; AIIMS च्या गुलेरियांनी सांगितलं कारण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : एका बाजूला कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व असा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत AIIMS चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय की, होम आयसोलेशन केल्यावर कोरोनाची चाचणी करण्याची गरज नाहीये. जेंव्हा होम आयसोलेशन संपेल तेंव्हा शरिरातील व्हायरस देखील मेलेला असेल आणि तो एकाकडून दुसऱ्याकडे प्रसारित देखील होऊ शकणारा नसतो. त्यांनी म्हटलंय की, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की सौम्य प्रकरणांमध्ये विषाणूची लक्षणे पहिल्यांदा दिसण्यापासून किंवा नमुना घेण्याच्या तारखेपासून सहा किंवा सात दिवसानंतर मरतात.

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

मात्र, आरटी-पीसीआर चाचणीद्वारे मृत विषाणूची उपस्थिती (व्हायरल अवशेष) आढळू शकतात ज्यामुळे कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो. परंतु तरीही असं मानणं अगदी सुरक्षित आहे की ती व्यक्ती यापुढे संसर्गजन्य नाही आणि विषाणूचा प्रसार करू शकत नाही. आरोग्य मंत्रालयाने लक्षणांनंतरच्या जर शेवटी सलग तीन दिवस ताप नसेल तर दहा दिवसांनंतर रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा सल्ला दिला आहे.

बेड्स, मेडीकल ऑक्सिजन तसेच आयसोलेशन सेंटर्सच्या कमतरतेमुळे सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्सनुसारहोम आयसोलेशनचा सल्ला दिला गेला आहे. मंत्रालयाने हे स्पष्ट केलंय की, 85 टक्के बाधित रुग्ण हे घरातूनच बरे होतात. त्यामुळे रेमडेसिव्हीर अथवा ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत काळजी करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं गेलंय.

हेही वाचा: स्फोट! दिवसभरात आढळले 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत दोन लाख 99 हजार 988 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या एक कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची दररोजची संख्या पाहता पुढील तीन दिवसांत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे जाऊ शकते.