esakal | गायत्री मंत्राच्या प्रभावाने कोरोनाचा खात्मा; मोदी सरकारला विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी सरकारचा नवा प्रयोग; गायत्री मंत्राने कोरोनाला पळवण्याचा घाट

मोदी सरकारचा नवा प्रयोग; गायत्री मंत्राने कोरोनाला पळवण्याचा घाट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गायत्री मंत्राने कोरोनाचा उपचार केला जाऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या एक संशोधन केलं जात आहे. हे काही साधंसुधं संशोधन नाहीये. तर ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात Rishikesh AIIMS यावर सध्या संशोधन करत आहे. कोरोना रुग्णांवर सामान्य उपचारांव्यतिरिक्त गायत्री मंत्राचा जप आणि प्राणायम केल्याने काही सकारात्मक प्रभाव पडतो का, याबाबत सध्या संशोधन सुरु आहे. या संशोधनाला केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने फंडीग केलेलं आहे.

विज्ञान मंत्रालयाकडून केल्या जाणाऱ्या या अध्ययनामागचा हेतू हा आहे की, मंत्रपठन केल्याने आणि प्राणायम केल्याने कोरोना सारखा असाध्य रोग बरा होऊ शकतो का? या संशोधनासाठी 20 रुग्णांवर अभ्यास केला जात आहे. 14 दिवसांपर्यंत चालणाऱ्या या चाचणीमध्ये रुग्णांच्या शरिरामध्ये होणाऱ्या बदलांची तपासणी केली जाईल. हा प्रयोगासाठी म्हणून क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठीची अधिकृत नोंदणीसुद्धा Indian Council of Medical Research म्हणजेच ICM च्या clinical trial registry कडे करण्यात आली आहे.

हेही वाचा: एका चुकीमुळे बंगालमध्ये डावे शिखरावरुन शून्यावर आले?

यापूर्वीही केंद्र सरकारच्या या विभागतर्फे इतर अशा संशोधनांसाठी निधी देण्यात आला आहे. सध्या देशात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूवर कसल्याही प्रकारची अधिकृत उपचारपद्धती अस्तित्वात नाहीये. त्यामुळे अनेक रुग्ण दगावत असून मोठी चिंताजनक परिस्थिती देशात तसेच संपूर्ण जगात झाली आहे. त्यामुळे या कोरोना विषाणूवरच्या विविध उपचार पद्धती विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोगिक अभ्यासांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यातच डॉ. रुची दुआ यांनी हा अर्ज केला होता. यासाठी त्यांना विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे तीन लाखांचा निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा: बंगालमध्ये पुन्हा हिंसा; केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला!

या संशोधनातील 20 रुग्णांना दोन गटांमध्ये विभागलं गेलं आहे. पहिल्या गटातील लोक सामान्य उपचारांसह सकाळी आणि संध्याकाळी प्राणायमाशिवाय गायत्री मंत्राचंही पठण करतात. तर दुसऱ्या समूहातील लोकांना कोरोनातून वाचण्यासाठी फक्त सामान्य उपचार दिले जात आहेत. या दोन्ही समूहातील रुग्णांच्या शरीरातील बदलांसाठी 14 दिवसांपर्यंत अभ्यास केला जाईल. गायत्री मंत्राचं पठण करणाऱ्या रुग्णांमध्ये काय विशेष फरक पडला याचा अभ्यास केला जाईल. तसेच या रुग्णांमधील थकवा आणि चिंता सारखी लक्षणे कमी झाली की नाही, याचेही मूल्यांकन केले जाईल.

एम्समध्ये पल्मोनोलॉजिस्ट आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. रुची दुवा यांनी सांगितलं की, हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांमध्ये गायत्री मंत्र आणि प्राणायमाच्या प्रभावाला पाहण्यासाठी एक पायलट अध्ययन आहे. एका प्रशिक्षित योगा प्रशिक्षाकच्या देखरेखीखाली हा प्रयोग पार पडेल. पुढील येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये या रुग्णांच्या आरोग्याला तपासून पाहिलं जाईल. या गायत्री मंत्र पठणामुळे तसेचच प्राणायमामुळे काही सकारात्मक बदल घडत आहेत, याचा अभ्यास याअंतर्गत करण्यात येईल.

loading image