आकाशवाणीचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्रं आता पुण्यातून 

मंगेश वैशंपायन : सकाळ न्यूज नेटवर्क  
बुधवार, 1 जुलै 2020

 पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग कार्यक्षम असून  तो राष्ट्रीय बातम्यांना न्याय देऊ शकेल, असा विश्वास मला वाटतो,  असे दिल्लीतील मराठी वृत्तविभागप्रमुख मृदुला घोडके यांनी सांगितले.  

नवी दिल्ली - तब्बल ८१ वर्षांची परंपरा असलेली , दिल्लीहून दीर्घकाळ प्रसारित होणारी आकाशवाणीची राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय बातमीपत्रे आजपासून (ता. १) पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहेत. ही बातमीपत्रे पुन्हा सुरू होणार हे चांगले झाले. राष्ट्रीय बातमीपत्रांचे स्वतःचे वेगळे स्थान आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सकाळ’ ला सांगितले. 

ब्रिटिश काळापासून म्हणजे १ ऑक्‍टोबर १९३९ पासून दिल्लीहून प्रसारित होणारी मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे २०१७ मध्ये केंद्र सरकारने मुंबईला हलविली. मात्र कोरोना महामारीमुळे मुंबईमधून ती प्रसारित करण्यास अडचणी येऊ लागल्या. गेले तीन महिने या बातमीपत्रांचे प्रसारण बंद होते. मुंबईत लोकल आणि इतर वाहतूक बंद असल्याने उपनगरातल्या वृत्तनिवेदक आन्ना मराठी बातमीपत्रांच्या वेळांमध्ये पोहोचणे अशक्य होते. आता ही बातमीपत्रे पुण्याहून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळामध्येही सध्या सुरू आहेत ती बातमीपत्रे बंद करू नयेत, अशा सूचना मी दिल्या होत्या असे जावडेकर यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी हे बातमीपत्र सकाळी ८.३० वाजता, दुपारी, १.५० वाजता आणि रात्री ८.०५ वाजता प्रसारित होत असे. आता पुणे केंद्रावरून सकाळी ९.२०, दुपारी दीड आणि रात्री ९.१५ या तीन वेळामध्ये ही बातमीपत्र प्रसारित होतील, असे आकाशवाणी वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी सांगितले. यातील रात्रीचे बातमीपत्र १५ मिनिटांचे तर उर्वरित दोन्ही बातमीपत्रे प्रत्येकी १० मिनिटांची असतील, असे सांगून ते म्हणाले की पुणे आकाशवाणीवरून सध्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रासह ८ छोटी-मोठी बातमीपत्रे प्रसारित होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्रांमध्ये आम्हाला बातम्यांची निवड, भाषांतर आणि संपादन हे सर्व करावे लागणार आहे. कारण पुण्यात फक्त 'पूल' बातम्या मिळतील असे केळकर यांनी सांगितले. दरम्यान, पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग कार्यक्षम असून तो राष्ट्रीय बातम्यांना न्याय देऊ शकेल, असा विश्वास मला वाटतो, असे दिल्लीतील मराठी वृत्तविभागप्रमुख मृदुला घोडके यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Radio national Marathi news bulletin is now from Pune