अमेरिकेची एमिली बनली 'पंजाबची सून'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

पंजाबच्या अमृतसरमधील मजिठा रोड येथे राहणाऱ्या पवनकुमार याच्या घरी, भांगेत सिंदूर, हातात नवीन नवरीचा चुडा, गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेली अमेरिकन मुलगी अगदी पंजाबी पतिव्रतेच्या रुपात आली. आणि सर्वच शेजाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

नवी दिल्ली : पंजाबच्या अमृतसरमधील मजिठा रोड येथे राहणाऱ्या पवनकुमार याच्या घरी, भांगेत सिंदूर, हातात नवीन नवरीचा चुडा, गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेली अमेरिकन मुलगी अगदी पंजाबी पतिव्रतेच्या रुपात आली. आणि सर्वच शेजाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्याला कारणही तसेच होते, साधारण शरीरयष्टी असलेल्या स्कुटर दुरुस्ती करणाऱ्या पवनने रविवारच्या (२५ ऑगस्ट) मुहूर्तावर एमिली वॉलिन या अमेरिकन तरुणीसोबत हिंदू रितिरिवाजाप्रमाणे लग्नगाठ बांधून तिला सून म्हणून घरी आणले होते.

सात महिन्यांपूर्वी पवनची फेसबुकच्या माध्यमातून एमिलीसोबत ओळख झाली. अल्पावधीतच मोबाईल नंबरचे आदानप्रदान झाले. ते तासनतास एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. त्यांच्या याच गप्पांचे मैत्रीत, आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन ते आता एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले आहे. एमिली आणि पवन या दोघांनी सात फेरे घेऊन, सातजन्मी सोबत राहण्याची शपथ घेतली आहे.

एमिलीनेच घातली पवनला मागणी

फेसबुकवर प्रथम एमिलीनेच पवनला मैत्रीसाठी विनंती पाठवत प्रेम व्यक्त केले. तिने पवनला अमेरिकेत येण्यासाठी सुचविले. मात्र, आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला ते शक्य नसल्याचे पवनने प्रांजळपणे सांगितले. त्यामुळे एमिली काही दिवसांपूर्वीच अमृतसरला आली. आणि दोघांनी लग्न केले. तिने फेसबुक अकाउंटवर दोघांच्या लग्नाचा फोटो, प्रोफाइल फोटो म्हणूनही ठेवला आहे.

भाषेचा अडसर

पंजाबी पवनच्या प्रेमात पडलेल्या एमिलीला पंजाबी भाषेचा बिलकुलही गंध नाही. ती सध्या 'सत श्री अकाल' एवढे एकच वाक्य बोलू शकते. तर पवनच्या आई-
वडीलांसह कुटुंबियांना ही इंग्रजी येत नाही. त्यामुळे ते एमिलीसोबत फक्त इशाऱ्यांच्या माध्यमातूनच संवाद साधत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American Emily becomes 'Punjab's daughter in law'