"युक्तीच्या गोष्टीं'साठी संघाने कंबर कसली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

अमित शहा-भैयाजी जोशी यांची दिल्लीत बंदद्वार चर्चा 

नवी दिल्ली- अस्सल हिंदीभाषक व संघाची मजबूत बांधणी असलेल्या तीन राज्यांतून भाजप नुकताच हद्दपार झाल्याने मनातून धास्तावलेल्या भाजपच्या नेतृत्वास "चार युक्तींच्या गोष्टी' सांगण्यासाठी संघनेतृत्वाने कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व संघाचे क्रमांक दोनचे नेते, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची काल (ता. 19) रात्री उशिरा दिल्लीत बैठक होऊन तीत वर्तमान स्थितीवर बंदद्वार पण दीर्घ चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती "सकाळ'ला मिळाली आहे.

हिंदीभाषक पट्ट्यात भाजपला सत्तेतून बाहेर जावे लागले. त्यामागची कारणमीमांसा व प्राथमिक विश्‍लेषण पक्षाच्या व संघाच्याही पातळीवर करण्यात आलेले आहे. मात्र, या पराभवाचे पडसाद 2019 च्या निवडणुकीवर उमटू नयेत, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरही चिंतेचे वातावरण दिसू लागले आहे. एनडीएतील एक एक सहकारी पक्ष सोडून जात असतानाही भाजप नेतृत्वाने त्यांची दखल न घेतल्याचे दाखविले होते. चंद्राबाबू नायडू दूर गेले. शिवसेना नेतृत्वाशी ताठरपणे वागल्याने तेही प्रचंड दुखावले. मात्र, ताज्या निकालांनंतर शहा यांनी शिवसेना नेतृत्वाशी मुंबईत जाऊन चर्चा करणे किंवा दिल्लीत रामविलास पासवान यांना भेटण्यासाठी खास दूत पाठविणे आदी हालचाली गतिमान झाल्या. बिहारमध्ये नितीशकुमार यांची साथ मिळताच लोक जनशक्ती पक्ष व उपेंद्र कुशवाह यांच्याबाबत भाजप नेतृत्वाचे वर्तन बदलल्याचे सांगितले जाते. यामुळे दुखावलेले पासवान यांचे पुत्र व उत्तराधिकारी चिराग यांनी गेले काही दिवस सूचक विधाने केलेली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर संघाने भाजप नेतृत्वाशी चर्चा करण्याचे सत्र सुरू केले आहे. जोशी व शहा यांच्या ताज्या बैठकीत आगामी काळातील रणनीती, सत्ता टिकविण्यासाठीची प्रस्तावित धोरणे-कार्यक्रम, राममंदिरापेक्षा वेगळा काही प्रस्तावित मुद्दा, भाजप नेतृत्वाचे वर्तन हाच मुद्दा चर्चेत डोकावल्याची माहिती मिळते. याच बैठकीतून पंतप्रधानांशीही दूरध्वनी संवाद साधला गेल्याचेही कळते. समाजाच्या विकासात व्यक्तीच्या अहंकाराला स्थान नाही, असे सरसंघचालकांनी नुकतेच सांगितले होते. भाजप नेतृत्वाची वर्तणूक ही स्वपक्षीयांनाच नव्हे तर भाजप नेत्यांनाही जाचकठरत असल्याच्या वाढत्या तक्रारींनंतर संघ व भाजप यांच्यात वरिष्ठ पातळीवर निवडक नेत्यांची आणखी एक समन्वय बैठक लवकरच होण्याची चिन्हे आहेत.

पासवान यांच्या घरी शहा 
शहा यांनी लोजपचे नेते रामविलास पासवान यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उपेंद्र कुशवाह भाजपच्या तंबूतून बाहेर पडले असतानाच शहा यांनी पासवान यांच्याशी खलबते करणे सूचक आहे. भाजपच्या मित्रपक्षांची गळती रोखणे हा त्यामागचा उद्देश उघड आहे. कारण, कुशवाह यांच्याप्रमाणेच पासवान व नितीशकुमार यांचेही वाजलेले आहे व भाजपने तेथे नितीशकुमार यांच्याशी पुन्हा सख्य केले आहे. आजच्या भेटीवेळी बिहारचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव हेही शहा यांचेबरोबर होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah-Bhaiyaji Joshi discusses in Delhi