अमित शहा यांनी ‘ढोकळा पार्टी’ द्यावी; ममता बॅनर्जी यांचा टोमणा

वृत्तसंस्था
Wednesday, 23 December 2020

पश्‍चिम बंगालच्या विकासाबाबत अमित शहा यांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांनी मला आता ‘ढोकळा पार्टी’ द्यावी, असा टोमणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मारला. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी त्यांच्या बंगाल दौऱ्यात सांगितलेली आकडेवारी चुकीची होती, असा दावा बॅनर्जी यांनी केला.

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या विकासाबाबत अमित शहा यांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांनी मला आता ‘ढोकळा पार्टी’ द्यावी, असा टोमणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मारला. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी त्यांच्या बंगाल दौऱ्यात सांगितलेली आकडेवारी चुकीची होती, असा दावा बॅनर्जी यांनी केला. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर ममता यांनी सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर टीकास्त्र सोडले. तृणमूलच्या कालावधीत उद्योग बुडाले, बेरोजगारी वाढली असा दावा करत शहा यांनी आकडेवारी सांगितली होती. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीतही राज्य ‘नंबर वन’ असल्याची टीका केली होती. मात्र, ममता यांनी आज नवी आकडेवारी सादर करताना, शहा यांची माहिती चुकीची ठरल्याचा दावा केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘बंगाल हे भयाण राज्य असल्याचे चित्रण शहा यांनी उभे केले. या राज्यात विकास नाही, नोकऱ्या नाही, असे त्यांनी सांगितले. तुम्ही अकरा वर्षांपूर्वीची स्थिती पाहिली होती का? तुम्ही तुलना कशी करता? वास्तव परिस्थितीबाबत मला काहीही आक्षेप नाही, मात्र उगाचच टीका मी सहन करणार नाही. आता शहा यांनी मला पार्टी द्यावी. मला ढोकळा आणि इतर गुजराती पदार्थ आवडतात,’ असा टोमणाही त्यांनी मारला. अमित शहा यांनी राजकीय हिंसाचार वाढल्याचा आरोप केला होता, मात्र गेल्या दहा वर्षांत राज्यातील हिंसाचार कमी झाल्याचे राष्ट्रीय आकडेवारीतूनच दिसत आहे, असा दावाही बॅनर्जी यांनी केला.

एक हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी केंद्रीय मंत्र्यासह 14 जणांना नोटीस

नाताळला ‘राष्ट्रीय सुटी’ का नाही?
भारतात नाताळच्या दिवशी राष्ट्रीय सुटी का नाही, असा सवाल करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्याची मागणी केली आहे. भाजपकडून द्वेषाचे राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘यापूर्वी नाताळला सर्वांना सुटी होती. भाजपनेच ही सुटी रद्द केली. ख्रिस्ती नागरिकांनी काय बिघडविले आहे? प्रत्येकाला भावना असतात,’ असे ममता कोलकता येथील नाताळ महोत्सवात म्हणाल्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah dhokala party mamta banerjee politics