
माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे.
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. तर, भाजपचे अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ खजिनदार होणार आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाची बहुचर्चित निवडणूकीअगोदर महत्वाची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.
बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन महत्वाच्या तीन पदांसाठी नावे निश्चित करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन. श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते, परंतु अनेकांनी त्यास विरोध केला आणि अखेरच्या क्षणी गांगुली यांचे नाव पुढे आले. आता निवडीमुळे भारतीय क्रिकेट मंडळावरही भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे.