मोदी हे उपभोगशून्य स्वामी - अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 जानेवारी 2020

शहा यांची चिडचिड !
कार्यक्रमाला अमित शहा महाराष्ट्र सदनात आले तेव्हा त्यांचा चेहरा वैतागलेला दिसत होता. कार्यक्रमाआधी परिवारातील निवडक कार्यकर्त्यांशी झालेल्या संवाद कार्यक्रमात ओळख करून देण्याचा सोपस्कार पार पडताक्षणी शहा उठून उभे राहिले. त्यांची स्वाक्षरी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सरळ झिडकारले. एवढेच नव्हे, तर प्रास्ताविक सुरू असताना, शहा यांनी वक्‍त्यांना मध्येच तोडले व ‘वर्णन बाद में होगा, कार्यक्रम को आगे बढाईए,’ असे जाहीरपणे बजावले. शहा यांची ही चिडचिड हा उपस्थितांत चर्चेचा विषय ठरला.

नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे एका शब्दात वर्णन करावयाचे तर समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘उपभोगशून्य स्वामी’ या शब्दात करावे लागेल. समाजाच्या वंचित वर्गातून आलेला एक नेता देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचला, त्यामागे त्यांचा त्याग, तपस्या आणि कर्तव्यनिष्ठा कारणीभूत आहे,’ अशा शब्दांत भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी आज मोदींबद्दलच्या भावना जागविल्या. देशाच्या जनतेने मोदींना वारंवार जनादेशाचा आशीर्वाद देऊन त्यांनाच जनमान्यता असल्याचे अधोरेखित केल्याचेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संघाच्या हिंदी विवेक मासिकाच्या दशकपूर्तीनिमित्त मोदी यांच्यावरील ‘कर्मयोद्धा ग्रंथ’चे प्रकाशन अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले,‘‘मोदींच्या काळात राजकीय पक्षाचा जाहीरनामा म्हणजे कागदाचा तुकडा ही संकल्पनाच बदलली.

मोदींच्या कणखर नेतृवाखाली सरकराने कलम ३७०, राममंदिर, तोंडी तलाक, सुधारित नागरिकत्व कायदा यासारख्या भाजप जाहीरनाम्यातील ९० टक्के गोष्टी पूर्ण केल्या आहेत. संवेदनशील व्यक्ती, कुशल प्रशासक, निडर सेनापती, विचारसरणीशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची बांधणी करणारा आणि संघटनशक्तीच्या आधारे सकारात्मक राजकारण करणारा नेता म्हणजे मोदी.’’ या कार्यक्रमाला हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर, रज्जूभाई श्रॉफ, विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांचे राजकारणापूर्वीचे जीवन समजून घेतल्याशिवाय ‘नरेंद्र मोदी’ हे रसायन समजून घेता येणार नाही, असे शहा म्हणाले. ‘राजा प्रथमो सेवकः’ या चाणक्‍याच्या तत्वाचे तंतोतंत आचरण करणारा नेता म्हणजे मोदी. गुजरातला मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याला भूकंप, दंगल अशा अडचणींतून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर नेले. तेच विकासाचे राजकारणा पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी सुरू ठेवले. म्हणूनच आज देशात परिवर्तन घडले आहे, असाही दावा शहा यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah talking