इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

टीम ई-सकाळ
Friday, 19 February 2021

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे देशातील जनता त्रस्त असून यावर सर्वत्र चर्चा सुरु आहेत.

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे देशातील जनता त्रस्त असून यावर सर्वत्र चर्चा सुरु आहेत. देशाचा सध्याचा मूड लक्षात घेऊन डेअरी प्रॉडक्ट बनवणाऱ्या अमूलनं आपल्या नेहमीच्या शैलीत कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य केलं आहे. अमूलच्या या कार्टुनला नेटिझन्सनी पसंती दर्शवली असून त्यावर अनेक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अमूलनं डॉट कूप या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अमूलनं हे कार्टूनवजा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कार्टूनमध्ये अमूल गर्ल चेहऱ्यावर नाराजीचे भाव दाखवत आपल्या कारमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहे. त्याचवेळी ती अमूलचं चीजब्रेडही खात आहे. दरम्यान, कार्टूनच्या कॅप्शनमध्ये 'इंधन दरवाढ त्रासदायक असली तरी अमूलचे पदार्थ परवडणारे आहेत' असा मजकूर देत जाहीरात केली आहे.

नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान, अमूलनं देशातील वाढत्या इंधन दरवाढीवर भाष्य केल्याबद्दल नेटिझन्सला आवडलं आहे. याबद्दल नेटिझन्सनं अनेक भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हटलं की, इंधन दरवाढीवरच्या अमूलच्या या भूमिकेमुळे आता सीबीआय, ईडी, आयटी आणि जीएसटी त्यांच्या मागे हात धुवून लागणार आहेत. तर दुसऱ्या एका युजरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेत दाखवत त्यांच्यासोबत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहमंत्री अमित शाह, सुब्रमण्यम स्वामी यांचे फोटो असलेला मिम पोस्ट केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amul comes up with witty take on surging fuel prices, netizens impressed