Coronavirus: साथीच्या रोगांमुळे जागतिक अर्थव्यवस्था होते डळमळीत; ३७ लाख कोटींचे वार्षिक नुकसान

Coronavirus: साथीच्या रोगांमुळे जागतिक अर्थव्यवस्था होते डळमळीत;  ३७ लाख कोटींचे वार्षिक नुकसान

नवी दिल्ली - वैद्यकीय क्षेत्रात नवनवे शोध लागत असतानाच कोरोना व्हायरससारख्या नव्या आजारांची साथ दरवर्षी येत आहे. अशा साथींच्या रोगांमुळे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत असते. 

युरोपीय संसदेच्या अहवालानुसार साथीच्या रोगांमुळे जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेला वार्षिक ५०० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३६ लाख ९७ हजार ९५० कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. संपूर्ण जगाच्या मिळकतीमध्ये हे प्रमाण ०.६ टक्के आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार साथीच्या रोगांमुळे जगभरातील मृतांची संख्या साधारण ७ लाख २० हजार आहे.

अर्थव्यवस्थेला फटका
अहवालानुसार २०१३-२०१६ मध्ये इबोला विषाणूंमुळे लायबेरियासारख्या देशांचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आठ टक्क्यांपेक्षा जास्त घटले. अशा साथीच्या रोगांमुळे सर्वाधिक नुकसान गरीब आणि कनिष्ठ उत्पन्न गटातील देशांचे होते. या देशांच्या अर्थव्यवस्थेवर १.६ टक्के दराने तर विकसित देशांवर ०.३ टक्क्यांनी परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि जागतिक बँकेच्या २०१९ च्या ताज्या अहवालानुसार साथीच्या रोगांमुळे जागतिक पातळीवरील ‘जीडीपी’चा दर २.२ टक्क्यांपासून ४.८ टक्क्यांपर्यंत खालावतो. एका निष्कर्षानुसार जागतिक अर्थव्यवस्थेला ३ ट्रिलियन डॉलरपर्यंत नुकसान होऊ शकते. सहारा आणि आफ्रिकी देशांमध्ये ‘जीडीपी’ १.७ टक्क्यांच्या दराने कमकुवत झाला आहे.  कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर साथीच्या रोगांचा सर्वांत जास्त परिणाम होतो, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) नोंदविले. 

व्यवसायांनाही फटका
व्हायरसचा पहिला फटका सार्वजनिक आणि खासगी आरोग्य क्षेत्राला बसतो. रुग्णालयांत रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे प्रशासकीय आणि कार्यरत खर्चात वाढ होते. उदा. जून २००९ आणि २०११ या काळात ‘एच१ एन१’ (स्वाइन फ्लू) ची साथ ब्रिटनमध्ये आल्यानंतर तेथील १७० रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली होती. याचप्रमाणे २०१७मध्ये झिका विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमधील वैद्यकीय खर्च ७ वरून १८ अब्ज डॉलरपर्यंत वाढला होता. साथीच्या रोगांमुळे पर्यटन क्षेत्राला जास्त नुकसान सोसावे लागते. अमेरिकेच्या ‘सेंटर फ्रॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ या संस्थेच्या अहवालानुसार ‘एचआयव्ही एड्स’च्या उपचारांवर वार्षिक सुमारे २३ हजार डॉलर खर्च केला जातो. २०१० मध्ये खर्चाचा आकडा ३ लाख ८० हजार डॉलरपर्यंत पोचला होता. साथीमुळे व्यापारी संकुल बंद ठेवले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com