
डायनोसॉरच्या अंड्यात आणखी एक अंडे
नवी दिल्ली - जीवाश्मांच्या इतिहासामध्ये प्रथमच एक चमत्कार उघड झाला असून दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांच्या पथकास मध्यप्रदेशात संशोधन करत असताना डायनोसॉरच्या अंड्यामध्ये आणखी एक अंडे आढळून आले आहे. विद्यापीठाकडून याबाबतचे निवेदन जारी करण्यात आले आहे. अशा प्रकारची घटना दुर्मिळात दुर्मिळ असून सरीसृप प्राण्यांमध्ये असे प्रकार घडल्याचे आतापर्यंत तरी समोर आले नव्हते, असे संशोधकांनी म्हटले आहे. हे ताजे संशोधन ‘जर्नल सायंटिफिक रिसर्च’ या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील बाग परिसरामध्ये अत्यंत विचित्र असे ‘टिटॅनोसॉरिड डायनोसॉर’चे अंडे सापडले असून यामुळे त्यांच्या प्रजोत्पादन प्रणालीवर आणखी प्रकाश पडू शकेल. या डायनोसॉरची जैविक संरचना ही कासव, पाली अथवा अन्य पक्ष्यांसारखी आहे का? या दोन्हींमध्ये नेमके काय साम्य आहे? हे देखील ताज्या संशोधनामुळे समजू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याआधीही उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणांवर करण्यात आलेल्या संशोधनामध्ये डायनोसॉरचे अवशेष आढळून आले होते.
बाग शहराजवळील पाडल्या खेड्यामध्ये मोठ्या संख्येने डायनोसॉरचे जीवाश्म आढळून आले होते. येथील डायनोसॉरच्या घरट्याचा अभ्यास करताना संशोधकांना हे विचित्र असे अंडे आढळून आले आहे.
जीवाश्मातील वैविध्य
येथे सापडलेल्या डायनोसॉरच्या घरट्यामध्ये दहा अंडी आढळून आली असून त्यामध्ये हे एक विचित्र असे अंडे आढळून आले आहे. मध्य आणि पश्चिम भारतामध्ये आढळून येणाऱ्या डायनोसॉरच्या जीवाश्मामध्ये मोठे वैविध्य दिसून आले असून ताज्या संशोधनामुळे यावर आणखी सखोल प्रकाश पडणार आहे, असेही दिल्ली विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
Web Title: Another Egg In A Dinosaur Egg Research From Delhi University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..