शाहीन बाग, जामिया हिंसाचारावर पंतप्रधान मोदी प्रथमच बोलले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

गरिबांना पक्की घरे 
दिल्लीतील आप सरकार गरिबांना घर देऊ इच्छित नाही आणि पंतप्रधान गृहकुल योजनेला सहकार्य करत नाही, असा आरोप मोदींनी केला. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास 2022 पर्यंत दिल्लीतील गरिबांना पक्के घर देऊ, असे आश्‍वासन मोदींनी या वेळी भाषणातून दिले.

नवी दिल्ली : सीएए कायद्याविरुद्ध सेलमपूर, जामिया नगर आणि शाहिन बाग येथे झालेला हिंसाचार योगायोग नसून त्यामागे राजकीय कट असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून सीएएविरुद्धच्या आंदोलनाला खतपाणी घातले जात असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्व दिल्लीतील कारकरडोमा येथे आयोजित सोमवारी विजय संकल्प सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसचा समाचार घेतला. ते म्हणाले, की सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून कॉंग्रेस आणि "आप' हे नागरिकांची दिशाभूल करत असून खोटी माहिती देत आहेत. आंदोलकांच्या हातात तिरंगा ध्वज आहे. मात्र आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधात रचले जाणारे षड्‌यंत्र लपविले जात आहे.

शाहिनबागच्या आंदोलनाचा उल्लेख करत मोदींनी नोईडातील नागरिकांना तेथून प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगितले. दिल्लीतील नागरिक शांत असून ते दिल्लीतील व्होटबॅंकेचे राजकारण पाहून संतापले आहेत. अशांतता निर्माण करणाऱ्या आंदोलकांना आणखी बळ मिळाले तर आणखी काही रस्ते बंद होऊ शकतात. अशा स्थितीत आपण दिल्लीला अराजकतेकडे ढकलू शकत नाही. दिल्लीतील नागरिकच दिल्लीला वाचवू शकतील. भाजपला मिळणारे प्रत्येक मत हे अशा प्रकारचे कारस्थाने थांबवू शकते. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सेलमपूर, जामिया नगर वा शाहिनबाग असो, तेथे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ही आंदोलने योगायोगाने सुरू झालीत का? तर नाही, हे प्रयोग आहेत. या आंदोलनामागे राजकीय हेतू असून, या माध्यमातून देशाच्या एकात्मतेला आव्हान दिले जात आहे. या वेळी मोदी यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. बाटला चकमकप्रकरणी उपस्थित करणारी कॉंग्रेस आता "तुकडे तुकडे'ची घोषणा करणाऱ्यांनाही वाचवत असल्याचा आरोप केला. लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवरही हे (अरविंद केजरीवाल) लोक प्रश्‍न उपस्थित करत आहेत, असे मोदी म्हणाले. 

गरिबांना पक्की घरे 
दिल्लीतील आप सरकार गरिबांना घर देऊ इच्छित नाही आणि पंतप्रधान गृहकुल योजनेला सहकार्य करत नाही, असा आरोप मोदींनी केला. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास 2022 पर्यंत दिल्लीतील गरिबांना पक्के घर देऊ, असे आश्‍वासन मोदींनी या वेळी भाषणातून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti-CAA Protests In Jamia Shaheen Bagh By Design Not Coincidence says Narendra Modi