Article 370 : निर्णय राजकीय नाही, तर राष्ट्रीय : उपराष्ट्रपती

पीटीआय
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले. 

अमरावती/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले. 

विजयवाडा येथे प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करताना उपराष्ट्रपती नायडू यांनी काश्‍मीरच्या मुद्यावर भाष्य केले. हा निर्णय प्रलंबित होता. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय देशासाठी चांगला आहे. हा राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मुद्दा आहे, असे नायडू म्हणाले. याबाबतचे विधेयक राज्यसभेत सादर होतानाची आठवणही त्यांनी सांगितली.

"हे विधेयक सादर झाल्यानंतर मी डोळ्यांत तेल घालून सर्व नियमांचा अभ्यास केला. या मुद्यावर चर्चा, वादविवाद होऊन नियमांची स्पष्टता यावी, अशीच मी इच्छा मनात धरली होती. पंडित नेहरूंनी 1963 मध्येच सांगितले होते की, हे कलम तात्पुरते आहे. संसदेत तयार झालेले 110 कायदे हे जम्मू-काश्‍मीर वगळता सर्व देशात लागू होत होते,' असे नायडू यांनी सांगितले. 

अद्यापही अस्वस्थ शांतता

काश्‍मीर खोऱ्यात शांतता असली तरी जनजीवन अद्यापही सुरळीतपणे सुरू झाले नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे सलग 23 व्या दिवशी बाजार आणि शाळा बंद होत्या. सार्वजनिक बसगाड्याही आगारातच उभ्या होत्या. काश्‍मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणची संचारबंदी उठविली असली तरी, सुरक्षा व्यवस्था अद्यापही तैनात आहे.

दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक झुल्फिकार हसन यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेत त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article 370 The decision is not political but national says Venkaiah Naidu