चिरयुवा व्होराजी!

motilal-vora
motilal-vora

वयाची नव्वदी गाठूनही राजकीय आणि संघटनात्मक कामकाजात सदैव सक्रिय राहिलेल्या मोतिलाल व्होरा यांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वर्तुळातील ओळख ‘चिरयुवा व्होराजी’ अशी होती. अहमद पटेल यांच्या निधनापाठोपाठ ज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा यांनीही आज जगाचा निरोप घेतल्याने पक्षातीत राजकीय संवादाचा सेतू साधणारा काँग्रेसचा आणखी एक दुवा निखळला. 

मृदुभाषा आणि न चिडता समोरच्याचे म्हणणे ऐकून समजावण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे या दोन्हीही नेत्यांचा काँग्रेसबाहेरही इतर नेत्यांशी थेट संवाद होताच, पण काँग्रेस मुख्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरच अचानक येऊन धडकणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही कोणतीही भीडभाड न बाळगता व्होराजींना सहजपणे येऊन भेटता येत असे आणि काम सांगता येत असे.

२१ अकबर मार्ग या काँग्रेसच्या मुख्यालयात सकाळी अकराला हजेरी लावणे हे व्होरा यांच्या सक्रियतेचे आणखी एक वैशिष्ट्य. वामनमूर्ती आणि झुकलेली मान आणि हळुहळू चालणे ही व्होरा यांची शारीरिक ओळख असली तरी, पक्ष मुख्यालयामध्ये पक्षाध्यक्षा सोनिया गांधी किंवा राहुल गांधी (पक्षाध्यक्ष असताना) येणार असतील तर, त्यांची चपळता आणि चालीतला वेग हा वाखणण्यासारखा असे. त्यामुळेच त्यांचे परममित्र आणि माजी संघटना सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी त्यांना ‘चिरयुवा’ असे नाव दिले होते, जे काँग्रेसच्या वर्तुळात चांगलेच प्रसिद्ध झाले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खर्चावर बारीक नजर
कोणत्याही नेते, सरचिटणीसांचे नसणे आणि व्होरा यांचे मुख्यालयात असणे हे काँग्रेसच्या मंडळींसाठी पुरेसे असे. काँग्रेस मुख्यालयातील कामकाजावर आणि पक्षाच्या खर्चावर त्यांची बारीक नजर असे. आजारपणातील उपचारासाठी आर्थिक मदत, एम्समध्ये भरती यासारखी कामे घेऊन त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या लक्षणीय असे. 

कामाच्या धबडग्यात या मंडळींना भेटता नाही आले. तर कार्यालयातील लोकांना किंवा शिपायांना पाठवून अशा मंडळींना ते बोलावून घेत आणि मदतीसाठी विचारपूस करत. मात्र, खजिनदार या नात्याने काँग्रेसच्या तिजोरीची चावी सांभाळणाऱ्या व्होरा यांच्याकडून  पक्षकार्यासाठी असो, प्रवासासाठी असो किंवा निवडणुकीसाठी असो, त्यांच्या काटकसरी स्वभावामुळे निधी मिळवणे काँग्रेसच्या नेते मंडळींसाठी महाकठीण कर्म असे.

सर्वांच्या मनांत आदर
कमी ऐकू येत असल्याने श्रवणयंत्राचा वापर करणाऱ्या व्होरा यांनी पत्रकारांच्या अडचणीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आणि नेते, कार्यकर्त्यांच्या अवाजवी मागण्या टाळण्यासाठी या श्रवणव्याधीचा अनेकदा खुबीने वापर केला. दुर्लक्ष करण्यासाठीचा विशिष्ट पद्धतीचा त्यांचा प्रश्नार्थक उद्‍गार हा काँग्रेसच्या वर्तुळात चिरपरिचित होता. पत्रकारांनी फार विचारल्यास ‘अपन तो उस चक्कर मे पडते ही नही’, असे म्हणून ते वेळ मारून नेत. किंवा अखबार में मैने भी पढा है, असे म्हणून बोलणे टाळत.

मात्र, मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यासाठी राजीव गांधींनी रशिया दौऱ्यावर जाण्याआधी पालम विमानतळावर बोलावून कसे सांगितले, हा किस्सा सांगताना, लखनौच्या विश्रामगृहावर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यातून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींना वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता यासारखे किस्से सांगताना त्यांची कळी खुलायची. सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये व्होरा यांच्याप्रति आदरभाव होता. नेतेमंडळींकडून व्यक्त होणारा हा आदरभाव संसदेमध्ये विशेषत्वाने दिसून येत असे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com