अरुण जेटली : भाजपच्या यशाचे वाटेकरी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 August 2019

- मोदींच्या वाटचालीत सिंहाचा वाटा
- वकील जेटली 
- आणि जेटली घसरले... 

- 1991 पासून जेटली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते भाजपचे प्रवक्ते होते. या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले, तेव्हा जेटली माहिती आणि नभोवाणी खात्याचे (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री झाले.

- जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) धोरणानुसार प्रथमच सुरू केलेल्या निर्गुंतवणूक मंत्रालयाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. नंतर कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार खात्याचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आला. जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्याने नोव्हेंबर 2000 मध्ये कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार आणि जहाज खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. "भूपृष्ठ'मधून जहाज हे नवे खाते निर्माण झाले आणि त्याचे पहिले मंत्री जेटली झाले. त्यानंतर पक्षांतर्गत जबाबदाऱ्या घेण्यासाठी त्यांनी मंत्रीपद सोडत भाजपचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्तेपद स्विकारले. 29 जानेवारी 2003 रोजी पुन्हा ते मंत्रीमंडळात दाखल झाले. कायदा व न्याय आणि वाणिज्य व उद्योग या खात्यांची धुरा आली. मे 2004 च्या निवडणुकीत "एनडीए'च्या सरकारला पायउतार व्हावे लागल्यानंतर ते भाजपचे सरचिटणीस झाले. वकिलीचा व्यवसायही सुरू केला. 

मोदींच्या वाटचालीत सिंहाचा वाटा
- जेटली गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. लालकृष्ण अडवानी यांनी त्यांची राज्यसभेतील भाजपचे नेते म्हणून 3 जून 2009 रोजी निवड केली. राज्यसभेतील भाजपचे नेते म्हणून त्यांनी उठावदार कामगिरी बजावली. महिला आरक्षणावरील चर्चेत अत्यंत अभ्यासपूर्ण, संशोधकाला साजेसे भाषण केले. जनलोकपाल विधेयकावर त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंना पाठिंब्याचे धोरण अवलंबले. 1980 पासून भाजपमध्ये राहिलेल्या जेटली यांनी 2014 पर्यंत कधीच थेट निवडणूक लढवली नव्हती. 2014 मध्ये प्रथमच त्यांनी अमृतसरमधून नवज्योतसिंग सिद्धूच्याऐवजी भाजपतर्फे लोकसभेसाठी निवडणूक लढवली. तथापि, कॉंग्रेसचे नेते व पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांना पराभूत केले. मात्र, मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर अरूण जेटली अर्थ आणि संरक्षण या दोन्हीही खात्यांची सूत्रे स्विकारली. 

वकील जेटली 
- आर. एस. लोढा विरुद्ध बिर्ला कुटूंबिय यांच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादात जेटली बिर्लांचे वकिल होते. राम गोपाल वर्माच्या "रन' या चित्रपटात राष्ट्रगिताचा अवमान झाल्याचा वाद उपस्थित झाला तेव्हा राम गोपाल वर्माचे वकील जेटली होते. नंतर हे गाणेच चित्रपटातून वगळण्यात आले. 84 व्या आणि 91 व्या घटनादुरूस्तीत जेटली यांनी योगदान दिले आहे. 

आणि जेटली घसरले... 
- पर्यटनमंत्र्यांच्या 21 ऑगस्ट 2014 रोजी झालेल्या बैठकीत जेटली यांनी "दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या छोट्याशा घटनेनेही जागतिक पर्यटनातून अब्जावधींची माया भारतात येईल', असे विधान केले होते. त्यांच्यावर सडकून टीका झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Jaitley was one of the reason behind BJPs success