esakal | दिल्लीत पुन्हा ‘केजरीवाल पर्व’
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीत पुन्हा ‘केजरीवाल पर्व’

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दिल्लीत पुन्हा ‘केजरीवाल पर्व’

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. केजरीवालांसह त्यांच्या अन्य सहा सहकाऱ्यांचाही शपथविधी या वेळी पार पडला. येथील रामलीला मैदानात ‘आप’चे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शानदार सोहळ्यामध्ये नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाची; तर मनीष सिसोदिया, गोपाल राय, सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि राजेंद्रपाल गौतम या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील विधानसभा निवडणुकीनंतरही केजरीवाल सरकारचा शपथविधी रामलीला मैदानावरच झाला होता. मात्र, नंतरच्या काळात ‘आप’मध्ये झालेली फाटाफूट, विखुरलेले जुने नेते आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या ‘शाहीनबागकेंद्रित’ आक्रमक प्रचारानंतरही केजरीवाल यांनी या निवडणुकीत यशश्री खेचून आणल्याने समर्थक आणि कार्यकर्ते प्रचंड उत्साहात होते. ‘लगे रहो केजरीवाल’ या प्रचारगीताच्या तालावर थिरकताना कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. मात्र, ‘आप’ची ओळख बनलेल्या गांधी टोपीसदृश टोपीला व्यासपीठावरून फाटा देण्यात आल्याचे दिसले. स्वतः केजरीवाल यांच्यासह एकाही मंत्र्याने ही टोपी घातली नव्हती. केजरीवाल यांच्यासह सर्व मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शपथ घेतली असली, तरी गोपाल राय यांनी घेतलेली शपथ आगळीवेगळी ठरली. राय यांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना स्मरून शपथ घेतली. निवडणूक प्रचारात साथ देणाऱ्या मंत्रिमंडळातील जुन्या सहाही सहकाऱ्यांना केजरीवाल यांनी पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली. दिल्लीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी मात्र  या सोहळ्याकडे पाठ फिरवली. तर, केजरीवाल यांनी, ‘‘निवडणूक प्रचारात आपल्याविरोधात बोलणाऱ्या विरोधकांना आपण माफ केले,’’ अशा शब्दांत पराभूत भाजपच्या जखमेवर मीठ चोळले.

विशेष निमंत्रित
आम आदमी पक्षाने या सोहळ्यासाठी ५० सर्वसामान्य दिल्लीकरांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिल्लीतील सातही भाजप खासदारांनादेखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांचा वाराणसीत कार्यक्रम होता. तर, भाजप खासदारांनी आणि नगरसेवकांनी शपथविधी कार्यक्रमात भाग घेणे टाळले. फक्त माजी विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी या कार्यक्रमात भाजपचे प्रतिनिधित्व केले. अर्थात, पक्ष पदाधिकाऱ्यांच्या या दांडीयात्रेमागचे कारण भाजपकडून देण्यात आलेले नाही.

‘मोदींनी विकासासाठी आशीर्वाद द्यावा’
मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, ‘आपले दिल्लीच्या विकासाला प्राधान्य राहील,’ असे सांगितले. या वेळी त्यांनी भाजपला चिमटे काढण्याची संधीही सोडली नाही. केंद्र सरकारच्या सहकार्याने दिल्लीला पुढे नेण्याचा आणि प्रथम क्रमांकाचे शहर बनविण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधीसाठी निमंत्रण पाठविले होते. परंतु, वाराणसीच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत. मोदींनी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी दिल्लीला पुढे नेण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावा, असे केजरीवाल म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकून देदीप्यमान विजय मिळविला आहे. या विजयाबद्दल आभार मानताना हा विजय दिल्लीकरांचा असल्याचे केजरीवाल म्हणाले. 

loading image