
"औरंग्याच्या औलादी" फडणवीसांच्या वक्तव्यावर ओवैसींचं प्रत्युत्तर, म्हणाले गोडसेंची औलाद...
मुंबई : कोल्हापूर येथे काही समाजकंटक तरूणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतान याचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे हिंदू मुस्लीम समाजात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. "त्यानंतर महाराष्ट्रात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होत आहे.
औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून आल्या?" असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
"महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की औरंग्याच्या औलादी, तुम्हाला सगळं माहितीये? मला माहिती नाही तुम्हाला किती माहिती आहे? पण मग गोडसेची औलाद कोण आहे? आपटेंची ओलाद कोण आहे? याचेही उत्तर द्या." असं मिश्किल उत्तर ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
दरम्यान, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेवगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड येथे हिंदू मुस्लीम समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून औरंगजेबाचे फोटो किंवा आक्षेपार्ह फोटो स्टेटसला ठेवण्यावरून वाद निर्माण होत आहेत.
तर कोल्हापुरात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर दोन्ही समाजाने शांतता सुव्यवस्था राखण्याचेही अवाहन केलं होतं.
कोल्हापुरानंतर बीडमध्ये वाद?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका तरूणाने औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तणावाचे वातावरण पसरले आहे. तर महाराष्ट्रातील तरूणांकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न का होत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे.