सिल्चर अद्याप पाण्यातच; आसाममध्ये पूरबळींची संख्या ११८ वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assam floods update Ten more people killed in landslides

सिल्चर अद्याप पाण्यातच; आसाममध्ये पूरबळींची संख्या ११८ वर

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या २४ तासांत पूर व दरडी कोसळल्याने आणखी दहा जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्युंमध्ये बारपेटा, धुब्री, करीमगंज आणि उदालगुरी जिल्ह्यांत प्रत्येकी दोघांचा तर काच्चर आणि मोरिगावमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे, एकूण पूरबळींची संख्या आता ११८ वर गेली आहे. प्रलंयकारी पुराचा मोठा फटका बसलेले सिल्चर शहर सलग सहाव्या दिवशीही पाण्यातच आहे. राज्यात गेल्या २४ तासांत आणखी ३१२ घरांचे नुकसान झाले.

राज्यातील काही भागांत पूर ओसरत असून काल ३० जिल्ह्यांत ४५ लाख पूरग्रस्त होते. आज ही संख्या २८ जिल्ह्यांतील ३३ लाख नागरिकांपर्यंत घटली, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. ब्रम्हपुत्रा आणि धुब्री या नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्या तरी राज्यातील काही जिल्ह्यांत पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली आहे.

पूरस्थिती गंभीरच

सिल्चर शहरात पूरस्थिती अद्याप गंभीर असून जिल्हा प्रशासनाकडून बचावमोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत असून यात रुग्णांना प्राधान्य दिले जात आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सिल्चरमध्ये खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या टाकल्या जात असून पूरस्थिती सुधारेपर्यंत हे सुरू राहील. तसेच पूरग्रस्तांपर्यंत हे साहित्य पोचविण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. एकट्या सिल्चरमध्येच तीन लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

रिलायन्सकडून २५ कोटींची मदत

पुराचा सामना करणाऱ्या आसामच्या मदतीसाठी रिलायन्सने पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी व त्यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री निधीत २५ कोटींची देणगी देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, रिलायन्स फाउंडेशनची पथकही सरकारी खात्यांबरोबर काम करत आहे.