
विधानसभा निवडणूक: एक तृतीयांश आमदारांची तिकिटे कापणार
नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची भाजपने तयारी सुरू केली आहे. यंदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या गुजरात व हिमाचल प्रदेशातील किमान दोन डझन आमदारांची तिकिटे धोक्यात असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. हिमाचल प्रदेशातील संघटनात्मक परिस्थिती यंदा भाजपसाठी आव्हानात्मक असून किमान एक तृतीयांश आमदारांची तिकिटे भाजप कापणार असल्याचे निश्चितपणे सांगितले जाते.
भाजपने हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांतील निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२४च्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांकडेही मिनी लोकसभा म्हणून पाहिले जात आहे. येथे कोणताही कसर सोडण्याच्या मनःस्थितीत भाजप नेतृत्व नाही. हिमाचल व गुजरातच्या तयारीला भाजपने वेग दिला आहे. संघ व भाजपच्या समन्वय समित्यांच्या बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. हिमाचल प्रदेशातील अलीकडच्या पोटनिवडणुकीत झटका बसल्यावर भाजप नेतृत्व सावध झाले आहे. पक्षाने दोनदा सर्वेक्षणे केली त्यात एक तृतीयांश आमदारांच्या विरोधात नाराजी मतदारांत असल्याचे फीडबॅक आले आहेत. मात्र भाजप व संघ मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यामागे ठामपणे उभे असले तरी अनेक आमदारांवर टांगती तलवार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने ज्यांचे उपद्रवमूल्य जास्त आहे ते आगामी ‘सुनामी‘तून वाचू शकतात. जे भाजप सोडतील त्यांचा कल काँग्रेस नव्हे तर ‘आप’कडे राहील हेही दिसत आहे.
हिमाचलमध्ये प्रेमकुमार धूमल व शांताकुमार यांच्या गटातील गटबाजी चालू आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व त्यांचे आमदार बंधू यांच्याकडे दूमल गटाचे नेतृत्व सध्या आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर दोन्ही गटापासून सारखेच अंतर ठेवून राहिले आहेत हा दिल्लीच्या दृष्टीने त्यांचा प्लस पॉईंट ठरला. दरम्यान, पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या छत्तीसगड व राजस्थान या दोन्ही राज्यांत अनुक्रमे रमण सिंह व वसुंधराराजे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवायचे नाही हे भाजप नेतृत्वाने निश्चित केले आहे. शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीशी जुळवून घेतल्याने त्यांना तूर्तास धोका नसल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीनंतर त्यांना दिल्लीला बोलावण्याची शक्यता कायम आहे.
गुजरातमध्ये ‘मुदतपूर्व’च्या हालचाली
गुजरातेत यंदा अखेरीस भाजपला अनुकूल वातावरण दिसत आहे. परिणामी तेथे ‘मुदतपूर्व’ निवडणुका घेण्याच्या हालचाली भाजपनेतृत्वाने सुरू केल्या आहेत. मोदी यांनी अलीकडे गुजरातचे लागोपाठ दौरे केले. त्यानंतर राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत असून मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी अनुकूल असल्याचे मत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्याच वर्षी २००२ मध्ये भाजपने तेथे मुदतपूर्व निवडणुका घेतल्या व गोध्राकांड व दंगलींची पार्श्वभूमी असूनही मोदींनी त्या एकहाती जिंकून दिल्या. या पार्श्वभूमीवर मोदींनी शनिवारी रात्री परदेश दौऱ्यावर जाण्याआधी गुजरातबाबत वरिष्ठ पक्षनेत्यांची बैठक घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे.
Web Title: Assembly Elections Bjp Gujarat And Himachal Pradesh Mla Tickets
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..