लष्करी अत्याचाराच्या दाव्यावर ठाम - शेहला रशिद

पीटीआय
Friday, 23 August 2019

"मी सरकारी प्रवक्ता नाही'
काश्‍मीरमध्ये मानवी हक्‍कांचे उल्लंघन सर्वत्र केले जाते. तेथे छळ होत आहे. जर तुम्हाला सरकारी प्रवक्ता बनायचे असेल तर बना. मी काही सरकारी प्रवक्ता नाही. कृपया, भाजप मुख्यालयात जाऊन पद मिळवा आणि निवडणूक लढवा, असे शेहला रशिद यांनी एका पत्रकाराला सुनावले.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या दाव्यावर आपण ठाम असल्याचे प्रतिपादन राजकीय कार्यकर्त्या शेहला रशिद यांनी गुरुवारी केले.

भारतीय लष्कर जम्मू- काश्‍मीरमधील जनतेवर अत्याचार करीत आहे, असा दावा शेहला रशिद यांनी रविवारी (ता. 18) केला होता. नागरिकांना विनाकारण ताब्यात घेणे, घरांवर छापे घालणे व नागरिकांचा छळ करणे, असे प्रकार लष्कराकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लष्कराने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या दाव्यांबाबत पुराव्यांची मागणी केली असता त्या म्हणाल्या, की लष्कराने चौकशी समिती नेमल्यावर मी याचे पुरावे देईन, असे त्यांनी स्पष्ट केले. मी तुमच्यासमोर माझे म्हणणे मांडले आहे. त्यावर लष्कराने चौकशी सुरू केली का, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी पत्रकारांना केला. काश्‍मीरहून आलेल्या नागरिकांशी मी चर्चा केल्यानंतरच मी हे विधान केले आहे. यात खोटे बोलण्याचे काहीही कारण नाही. मी एक नाही तर अनेक विधाने केली आहेत, असे त्या म्हणाल्या.

लष्कराबद्दल ट्‌विटरवर केलेल्या आरोपांचे पुरावे एका पत्रकाराने मागितले असता, त्या संतप्त झाल्या. "मी तुम्हाला पुरावे कशासाठी देऊ? मी ट्‌विट का करू शकत नाही? मोदी सरकारच्या सत्तेत त्याला बंदी आहे का?' असे रशिद यांनी विचारले. तुम्ही काश्‍मीरला जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे दाखवा. मी जे म्हणत आहे, ते तुम्ही दाखवत नाही. मी काही अफवा पसरवत नाही. मला पूर्ण विश्‍वास आहे. माझ्या दाव्यांवर मी ठाम आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asserted on military tort claims shehla rashid