दारू देत नाही, थांब बघताेच...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

रात्री दारू दिली नाही म्हणून बायणा येथील मोगाबाय येथे असलेल्या रेगो बारमध्ये तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वास्को पोलिसांनी तीघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुरगाव (गोवा) : रात्री साडे दहा वाजल्यानंतर दारू दिली नाही म्हणून बायणा येथील मोगाबाय येथे असलेल्या रेगो बारमध्ये  तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वास्को पोलिसांनी तीघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच यामधील एका हल्लेखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगाबाय बायणा येथील रेगो बारचे चालक सुदेश आमोणकर यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे.

बायणा येथीलच नबी महम्मद शेख आणि त्याचे अन्य दोन बंधू मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रेगो बारमध्ये गेले आणि दारूची मागणी केली. परंतू बार सुरू ठेवण्याची वेळ मर्यादा संपल्याने दारु देता येत नाही असे तक्रारदार आमोणकर यांनी हल्लेखोरांना सांगितले.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राजेश आचारी यांनी साडेदहा नंतर दारु देता येत नाही असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता, तीघांनी त्याच्यावर बियरच्या बाटलीने हल्ला करून जबर जखमी केले. यात राजेशच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर वार करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी वास्को पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जबर जखमी असलेल्या राजेशला गंभीर अवस्थेत चिखली उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतू हल्लेखोर पोलिसांना सापडले नाही. या हल्ल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास करून तीघा हल्लेखोर भावांपैकी नबी महम्मद शेख याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस अधिक तपास करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack as no alcohol was given in goa city; one arrest