रिक्षाचालकाच्या मुलीला दहावीमध्ये 98.31 टक्के

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

"माझे आई-बाबा मला डॉक्टर बनवू इच्छितात आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. नियमित अभ्यास, कठोर परिश्रम, पालकांचे मार्गदर्शन आणि भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न ही गुरुकिल्ली हाताशी ठेवल्यामुळे मला हे यश मिळणे शक्य झाले," असे मत आफ्रिनने व्यक्त केले.

अहमदाबाद (गुजरात) : वडिलांचा आदर्श समोर ठेऊन आफ्रिनने दहावीच्या परिक्षेत यशाचे शिखर गाठले आहे. घरच्या परिस्थितीची जाण आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ऑटो रिक्षाचालकाची मुलगी आफ्रिन शेख हीने दहावीच्या परिक्षेत गुजरात स्टेट बोर्डांतर्गत 98.31 टक्के इतके गुण मिळवले आहे.  

ती म्हणाली, "माझे आई-बाबा मला डॉक्टर बनवू इच्छितात आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. नियमित अभ्यास, कठोर परिश्रम, पालकांचे मार्गदर्शन आणि भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न ही गुरुकिल्ली हाताशी ठेवल्यामुळे मला हे यश मिळणे शक्य झाले." आफ्रिनचे वडील शेख मोहम्मद हमझा यांनी आपल्या मुलीच्या यशाचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, "मी नेहमीच तिला अभ्यास करण्यास प्रोत्साहन देत आलो, कारण चांगल्या भविष्यासाठी शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे तिच्या या निकालामुळे माझ्या तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. यापुढे भविष्यात तिने एक सक्षम डॉक्टर बनावे, त्या दिशेने प्रयत्न करावे आणि देशाची सेवा करावी, असे मला वाटते."

दहावीच्या गुजरात बोर्डाच्या परिक्षा 12 मार्च ते 23 मार्च या काळात घेण्यात आल्या होत्या. या वर्षी परीक्षेसाठी दहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 67.5 टक्के इतकी आहे, जी गेल्या वर्षीच्या 68.24 टक्के होती. जीएसईबी बोर्डाच्या एसएससी परीक्षेत पहिला क्रमांक सावनी हिल ईश्वरभाईने पटकवला आहे. तिला सर्वाधिक 99 टक्के (600 पैकी 594) गुण मिळाले आहे, तर दुसरा क्रमांक लाडणी कृषी हिमांशुकुमारचा असून तिने 589 गुण मिळवले आहे. तिसऱ्या क्रमांकावर हिंगराजीया प्रियलकुमार जितुभाई असून तिने 586 गुणांची कमाई केली आहे.

एसएससीसाठी बसलेल्या एकूण 368 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सूरतचा निकाल सर्वाधिक 80.06 टक्के लागला आहे, तर दाहोदचा सर्वात कमी 37.35 टक्के गुण मिळाले आहे. याशिवाय, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा अधिक गुण मिळवण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 72.69 आहे, तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 63.73 आहे.

Web Title: auto driver s girl achieve 98.31 percent in ssc in gujrat