देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

तिने म्हटलं की, पायलट बनण्यासाठी आपली मानसिक अवस्था चांगली लागते.

श्रीनगर : काश्मीरमधील 25 वर्षीय आयशा अजीज ही देशातील सर्वांत तरुण महिला पायलट बनली आहे. तिच्या या यशानंतर आयशा महिलांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली आहे. काश्मीरी महिला तिच्याकडे एक सशक्त प्रतिनिधी म्हणून पाहत आहेत. इतकंच नव्हे, तर आयशा 15 व्या वर्षीच पायलट लायसन्स मिळवणारी सर्वांत युवा विद्यार्थी राहिलेली आहे. अलिकडेच तिने रशियातील सोकोल एअरबेसवर फायटर प्लेन मिग-29 उडवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर आयशाने बॉम्बे फ्लाईंग क्लबमधून एविएशनमध्ये ग्रॅज्यूएशन प्राप्त केलं आणि 2017 मध्ये कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवलं. 

एएनआय या वृत्तसंस्थेने तिची मुलाखत घेतली. तिने म्हटलं की, गेल्याकाही वर्षांमध्ये काश्मीरच्या महिलांनी खूप प्रगती केली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी उंची गाठली आहे. पुढे तिने म्हटलं की, मला वाटतंय की काश्मीरच्या महिला चांगली कामगिरी पार पाडत आहेत.  आयशाने म्हटलंय की, मला लहानपणापासून प्रवास करायला आवडतं. त्यामुळेच मी हे क्षेत्र निवडलं. मी विमानातील उड्डाणासाठी खूप उत्सुक असायचे. हे काम करताना आपल्याला मोठ्या संख्येने लोकांना भेटता येतं. म्हणूनच मला हे काम आवडलं. हे काम खूपच आव्हानात्मक असून ते पठडीबाहेरचं आहे. 

हेही वाचा - World Over Farmers Protest : ग्रेटा थनबर्ग-रिहानाचं समर्थन; तर कंगनाचा थयथयाट
पुढे तिने म्हटलं की, पायलट बनण्यासाठी आपली मानसिक अवस्था चांगली लागते. विमानात आपल्याला 200 प्रवाशांसोबत उडावं लागतं. हे खूपच जबाबदारीचं काम आहे. पायलट बनण्यासाठी आयशाने आपल्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत. तिने म्हटलं की, आईवडिलांच्या पाठिंब्याशिवाय तिला पायलट बनणे, अशक्य होते. मी माझ्या वडिलांना सर्वांत मोठा आदर्श मानते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayesha Aziz from Kashmir becomes Indias youngest female pilot