अयोध्यानगरीवर ड्रोनची करडी नजर; कडेकोट सुरक्षा

पी. बी. सिंह : सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 3 August 2020

राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान  उपस्थित राहणार असल्याबद्दल दशरथ महाल बडा स्थानचे महंत बिंदुगद्दाचार्य स्वामी देवेंद्र प्रसादचार्य यांनी आनंद व्यक्त करीत हा क्षण गौरवशाली असल्याचे सांगितले. 

अयोध्या - अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे.  या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने अयोध्यानगरीमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सर्वत्र ड्रोन कॅमेरांद्वारे नजर ठेवली जात असून बाहेरुन येणाऱ्यांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात सुरु असलेला वाद सुटल्यानंतर राममंदिर उभारणीला वेग आला आहे. मंदिराचा आराखडा, खांब आणि इतर अनेक बाबी गेल्या अनेक वर्षांपासून तयारच होत्या. त्यामुळे हा सोहळा लाखोंच्या उपस्थित होण्याचा अंदाज होता. मात्र, कोरोनामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. मात्र, तरीही उत्तर प्रदेश सरकारने हा सोहळा भव्य करण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मंत्री कमल राणी यांचे आज निधन झाल्याने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आजचा त्यांचा अयोध्येचा आढावा दौरा रद्द केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रमासाठी कोरोनासंदर्भात सर्व निर्बंधांचे पालन काटेकोरपणे केले जाणार असल्याने निमंत्रित व्यक्तींशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अयोध्येत बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याबरोबरच शहरातील पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरातील दुकाने मात्र खुली असणार आहेत.

महंतांनी मानले मोदींचे आभार
राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याबद्दल दशरथ महाल बडा स्थानचे महंत बिंदुगद्दाचार्य स्वामी देवेंद्र प्रसादचार्य यांनी आनंद व्यक्त करीत हा क्षण गौरवशाली असल्याचे सोमवारी सांगितले. आता प्रतीक्षा संपली असून शुभ वेळ आली आहे. आम्ही सर्व जण खूप प्रसन्न आहोत आणि त्रेतायुगाची अनुभूती मिळेल अशी दिवाळी साजरी करणार आहोत, असे ते म्हणाले.

कोविड पॉझिटिव्ह अमित शहांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती अडवाणींची भेट

सुरक्षेसाठी...
    ड्रोनच्या माध्यमातून महत्त्वांच्या मार्गांवर नजर. 
    अयोध्येतील लोकांना शहरात फिरण्यावर बंदी नसेल. 
    गरजेशिवाय बाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन. 
    बाहेरील लोकांना शहरात प्रवेशबंदी.

अन्सारींना निमंत्रण?
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील बाबरी मशिदीचे पक्षकार इकबाल अन्सारी यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत असण्याची शक्यता असून त्यांच्यासह सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारुखी आणि अयोध्येतील मोहम्मद शरीफ हेही भूमिपूजनात सहभागी होऊ शकतात.

लॉकडाउनमध्ये ब्रिटनवासियांसाठी 'भांगडा' नृत्य ठरले ऊर्जेचा स्त्रोत

पुजाऱ्यांवरच बंदी
राममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनाच मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे सहाय्यक पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रदीप दास हे सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी खबरदारीचा उपाय म्हणून श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने सत्येंद्र दास यांच्यावर निर्बंध घातले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya ram mandir Drones Help In Surveillance and Tight security