esakal | अयोध्येतील रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट

बोलून बातमी शोधा

Shriram
अयोध्येतील रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट
sakal_logo
By
शरत प्रधान

अयोध्या - कोरोना संसर्गामुळे अयोध्येतील रामजन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाच्या उत्सवात तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेल्या रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आला. हा मुकुट आजच्या उत्सवासाठीच एका अज्ञात भक्ताने समर्पित केला होता.

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला पाचशे वर्षांत प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. १९९२ पासून रामलल्लाच्या मूर्तीसाठी चांदीचा मुकुट वापरला जात होता. आता रामलल्लासह इतर तिघा भावांच्या मूर्तींनाही शुद्ध सोन्याचा मुकुट घालण्यात आला आहे. या मुकुटांची किंमत ११ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी सतेंद्र दास यांच्या ताब्यात हे मुकुट काही दिवसांपूर्वीच आले होते. आज श्रीरामासह इतर मूर्तींना नवे वस्त्र परिधान करून हे मुकुट घालण्यात आले. दरवर्षी अनेक प्रतिष्ठीत नेत्यांच्या आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा रामजन्मोत्सव यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडक लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मात्र, रामलल्लाला शरयू नदीच्या पाण्याने आंघोळ घालून नंतर सर्व नेहमीची विधीवत पूजा पार पाडली गेली, असे पुजाऱ्यांनी सांगितले. प्रभूला विविध पक्वानांचा भोगही चढविण्यात आला. हा प्रसाद नंतर शहरातील नागरिकांना घरपोच पोहोचविला जाणार आहे.