Ayodhya Verdict : अडवानी म्हणतात, 'मी देवाचे आभार मानतो'

वृत्तसंस्था
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

Ayodhya Verdict : नुकतेच 93 व्या वर्षात पदार्पण केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी एकेकाळी राम जन्मभूमी आंदोलन उभं केलं.आज, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.  

नवी दिल्ली : नुकतेच 93 व्या वर्षात पदार्पण केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी एकेकाळी राम जन्मभूमी आंदोलन उभं केलं. देशभरात रथयात्रा करून, त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनाची धग वाढवली. बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी ते आरोपीही आहेत. आज, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.  

निकालानंतर लालकृष्ण अडवानी यांनी म्हटले आहे की, अयोध्येतील रामजन्मभूमी विवादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाबाबत मनापासून आनंद झाला. आता जे भव्य मंदिर उभारले जाईल ते राष्ट्रनिर्माणच असेल. अयोध्या आंदोलन हे स्वातंत्र्यानंतरचे देशातील सर्वांत मोठे व व्यापक आंदोलन होते. मंदिर आंदोलनाचा मी एक भाग होतो, याचाही मला विलक्षण आनंद आहे. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. एका निवेदनाद्वारे अडवानी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

अडवानी सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अडवानी यांच्या जागी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरचे प्रतिनिधित्व करतात. नुकताच अडवानी यांचा 92वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अडवानी यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya verdict reactions of bjp leader l k advani on supreme court judgement