अयोध्येत लॉकडाउनजन्य परिस्थिती; बाहेरच्यांना प्रवेशबंदी

टीम ई-सकाळ
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अयोध्याच्या परिसरात याची आतापासूनच तयारी सुरु असून याठिकाणी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्यदिव्य राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. नियोजित कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पोलिस सज्ज झाले असून 3 ऑगस्टपासून अयोध्येच्या बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओळखपत्रकाशिवाय याठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. राम जन्मभूमीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रावणी पूर्णिमेच्या पर्वसंध्येला म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी बाहेरुन येणाऱ्या श्रद्धाळू व्यक्ती अथवा समूहाला अयोध्येत प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध 4 आणि 5 ऑगस्ट कायम ठेवण्यात येणार आहेत.  

अमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

पालिस सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव अयोध्या नगरीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी असेल. अयोध्याच्या परिसरात याची आतापासूनच तयारी सुरु असून याठिकाणी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. बाहेरुन येणारी वाहने आणि महामार्गावरील बसेसचीही तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या ओळख पत्राची चाचपणी देखील करण्यात येत आहे. अयोध्या सिटी सर्कलमध्ये येणाऱ्या लोकांचीही चौकशी सुरु असून सरकारी ओळखपत्र पाहूनच त्यांना सोडण्यात येत आहे.  

पाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न

अयोध्येतील हॉटेल्स, धर्मशाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी साध्या वेशात पोलिस तैनात असून संशयास्पद हालचालींवर ते बारिक लक्ष ठेवून आहेत. 5 ऑगस्ट रोजी अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या राममंदिराचे भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राममंदिर विश्वस्त ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी कार्यक्रमाला बोलवण्यात आलेल्या पाहुणे मंडळींची यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. जवळपास 200 प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमी पूजन करण्यात येणार आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya will be locked before Ram temple bhami pujan all barriers looking for outsiders