Positive Story : एका व्हीडिओने बदललं बाबांचं आयुष्य; 'बाबा का ढाबा' झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

हा क्षणिक आणि आभासी सोशल मीडिया कधी काय घडवून आणेल, याचा काही नेम नाही.

सोशल मीडिया हे आभासी जग आहे असं म्हटलं जातं. या आभासी जगात जास्त काळ वावरणं आणि ते फार मनावर घेणं हे काही योग्य नाही, असंही म्हटलं जातं. काही काळ वास्तवापासून लांब राहण्यासाठी अथवा क्षणिक सुखासाठी लोक इथे जगत असतात, असंही म्हणतात. मात्र, हाच क्षणिक आणि आभासी मीडिया कधी काय घडवून आणेल, याचा काही नेम नाही. शिवाय हे घडणं हेही सर्वस्वी आपल्या हातात नसतं. अशीच काहीशी आश्चर्यकारक तरीही सुखद अशी गोष्ट या सोशल मीडियाच्या ताकदीने घडवून आणली आहे. गरजवंतांना मदत करण्यासाठी अनेकजण या सोशल मीडियाचा वापर करत असतात. अनेकांना याद्वारे मदत मिळतेही. अशीच मदत एका 80 वर्षांच्या बाबांना मिळालीय. 

 

बुधवारी एका ट्विटर युझरने वयोवृद्ध जोडीचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की याचा त्या वयस्कर दाम्पत्याच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या जोडीने दिल्लीमधील मालवीय नगरमध्ये रस्त्याच्या कडेला 'बाबा का ढाबा' नावाचा एक ढाबा उघडला होता. परंतु, फारसे लोक तिथे जात नसल्याने त्यांचा व्यवसाय मंदगतीने सुरु होता. त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला ज्यात त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. हा व्हिडिओ पाहून अनेकांचं हृदय पिळवटून आलं. अनेकांनी हा व्हिडिओ तुफान शेअर केला. आणि बाबांच्या ढाब्यावर गर्दी होऊ लागली. बुधवारी बनवलेल्या या व्हीडिओनंतर आज तुफान गर्दी त्यांच्या ढाब्यावर ओसंडून वाहत आहे. या बाबांचं दु:ख मिटवण्यासाठी प्रत्येकाचा एक शेअर उपयोगी पडला आहे.

सध्या ट्विटरवर बाबा का ढाबा हा हॅशटॅग ट्रेंडीग आहे. अनेक माध्यमांनी याची दखल तर घेतली आहेच त्याबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही या बाबांना मदत करायला पुढाकार घेतला आहे. सोनम कपूर, रविना टंडन, स्वरा भास्कर यांसह अनेकांनी बाबांसाठी आनंद व्यक्त करुन मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी आज 'बाबा का ढाबा'ला भेट दिली. आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढून ती ट्विटरवर शेअर केली. भारतीय क्रिकेटर अश्निननेही ट्विट करुन मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. सोनम कपूरनेही बाबांची माहिती मागितली आहे. एकेकाळी गिऱ्हाईकांसाठी वाट पाहणाऱ्या बाबांच्या ढाब्यासमोर आता लाईन लागली आहे. अनेकजण त्यांच्यासोबत सेल्फीही काढत आहेत. एरव्ही एकमेकांवर हेवेदावे करण्यासाठी वापरला जाणारा सोशल मीडिया क्षणिक असला तरीही एखाद्याच्या आयुष्यात आनंद देण्यास तो यापद्धतीने कारणीभूत ठरू शकतो ही देखील सकारात्मक बाबच म्हणायला हवी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baba ka dhaba malviya nagar delhi viral video