बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय; लष्करप्रमुखांची माहिती

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

काही दिवसांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी उद्धवस्त केलेला बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी दिली.

दिल्ली : काही दिवसांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी उद्धवस्त केलेला बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते.

दरम्यान, सध्या पाकिस्तानने पुन्हा त्या ठिकाणी लोकांची जमवाजमव सुरु केली आहे, असे जनरल रावत म्हणाले. कालच एका वर्तमानपत्राने बालकोटमधील दहशतवादी तळ सुरु झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी या तळावर १२९ दहशतवादी सज्ज आहेत असे एनडीटीव्हीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. या ठिकाणी 500 दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सच्या मिराज-२००० फायटर विमानांनी बालकोटच्या तळावर इस्रायली बनावटीच्या स्पाइस बॉम्बने हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झाले नाही हे पाकिस्तानने दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे प्रसारमाध्यमांना ते दोन महिन्यांनंतर घेऊन गेले. पुढच्या काही दिवसात पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण करणार आहेत. त्यापूर्वी ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्दावरुन भारताला घेरण्याची तयारी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balakot reactivated by Pak very recently says Army Chief General Bipin Rawat