जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफकडून उद्या भारत बंदची हाक | Caste Census | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat band

जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफकडून उद्या भारत बंदची हाक

नवी दिल्ली : ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशनकडून (BAMCEF) उद्या म्हणजेच 25 मे रोजी विविध मागण्यांसाठी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने इतर मागास जातींची जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिल्याने भारत बंदची हाक दिली असून, भारत बंदला बहुजन मुक्ती पार्टीचाही पाठिंबा मिळाला आहे. या भारत बंदमध्ये आणखी काही मागण्याही मांडल्या जाणार असल्याचे बोलले जात असून, यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन पुन्हा सुरू करावी, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी द्यावी, लोकांना लसीकरण करण्यास भाग पाडू नये या गोष्टींचा समावेश असू शकतो.

BAMCEF चे अध्यक्ष वामन मेश्राम म्हणाले की, आमच्या भारत बंद आंदोलनाला राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा आणि इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, काही लोक आमच्या बंदबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. विशेषत: ओबीसी समाजातील लोकांना आंदोलनात सामील होऊ नये म्हणून फसवले जात आहे. भारतीय युवा मोर्चाने आंदोलनाच्या मागणीबाबत सांगितले की, आमची प्रमुख मागणी ही आहे की, जनगणनेत जातींच्या संख्येचाही समावेश करण्यात यावा. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे.

या मागण्यादेखील मांडण्याची शक्यता

दरम्यान, उद्याच्या भारत बंदमध्ये निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर न करणे, जात जनगणना, खाजगी क्षेत्रात एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण देणे, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देणे आणि सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी न करण्याची मागणी यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ओडिशा आणि मध्य प्रदेशातही जुन्या पेन्शन योजनेत पंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. आदिवासींचे संरक्षण करणे, कोरोना लसीकरण ऐच्छिक करणे आणि कामगार कायदे मजबूत करणे आदी मागण्याही मांडल्या जाऊ शकतात.

बंदचा कुठे होऊ शकतो परिणाम

दरम्यान, उद्याच्या भारत बंदच्या परिणामाबद्दल बोलायचे झाले तर, या बंदचा परिणाम सार्वजनिक वाहतूक आणि बाजारपेठा उघडण्यावर होऊ शकतो. यामुळे सामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. या भारत बंदचा देशव्यापी परिणाम होणार नसला, तरी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भागात त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

Web Title: Bamcef Calls Bharat Bandh Tomorrow To Demand Caste Census

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top