जगातील अव्वल विमानतळांमध्ये बंगळुरू, दिल्लीचा समावेश

बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे
delhi-airport
delhi-airportsakal

नवी दिल्ली : विमानकंपन्या चालविण्याचे आव्हानात्मक वातावरण असूनही, जागतिक स्तरावर विमानोड्डाणांच्या संख्येत २०२२ या वर्षात २०२१ च्या तुलनेत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सेवा वेळेत देण्याबाबत बंगळुरूचे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा जागतिक पातळीवरील अव्वल दहा विमानतळांमध्ये समावेश झाला आहे. ‘सिरियम’ या विमानचालन विश्लेषक कंपनीचा हा अहवाल आहे.

बंगळुरू व दिल्ली येथील दोन्ही विमानतळे २०२१ मध्ये पहिल्या दहा विमानतळांच्या यादीत नव्हती. सिरीयमच्या ‘ऑन-टाइम परफॉर्मन्स रिव्ह्यू २०२२’ या अहवालानुसार, विमानांचे वेळेवर आगमन आणि निर्गमन यांबाबतीत बंगळुरूचे विमानतळ २०२२ मध्ये जागतिक स्तरावर दुसरे सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. जपानचे हनेदा विमानतळ हे यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे विमानतळ ठरले. दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ हे जागतिक स्तरावर सातव्या स्थानावर आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ११व्या क्रमांकावर आहे.

‘‘बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे, याचे कारण हे विमानतळ २०२१ मध्ये अव्वल २० विमानतळांच्या यादीतही नव्हते. मोठ्या विमानतळांसाठीच्या स्वतंत्र जागतिक क्रमवारीत हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरूचे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नईचे चेन्नई विमानतळ आणि कोलकात्याचे नेताजी सुभाष चंद्र बोस विमानतळ अनुक्रमे ११ व्या, १५ व्या, १६ व्या आणि १८ व्या स्थानावर आहेत.

मध्यम विमानतळांच्या यादीत जयपूर विमानतळ आणि कोची विमानतळ ही अनुक्रमे नवव्या आणि १८व्या स्थानावर आहेत. लहान विमानतळांच्या श्रेणीतील सर्वोत्तम २० विमानतळांच्या यादीत एकही भारतीय विमानतळ नाही,’’ अशी माहिती एअरपोर्टस् कौन्सिल इंटरनॅशनल-एसीआय वर्ल्डचे महासंचालक लुईस फेलिप डी ऑलिव्हिरा यांनी दिली.

इंडिगो व एअरएशिया इंडिया या कंपन्या आशिया पॅसिफिक प्रदेशात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. अमेरिकेतील डेल्टा एअरलाईन्स ही सर्वोत्तम जागतिक विमान कंपनी ठरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com