भारत-श्रीलंका यांच्यातील मित्रत्वाचे श्रेय राजीव गांधींना जाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv gandhi

भारत-श्रीलंका यांच्यातील मित्रत्वाचे श्रेय राजीव गांधींना जाते

भारताचा शेजारील देश श्रीलंकेत सध्या अराजकाची स्थिती आहे. आर्थिक संकटांमुळे श्रीलंकेच्या पंतप्रधांनांना सत्तेपासून पायउतार व्हावं लागलं. श्रीलंकेत दूध, पेट्रोल -डिझेल आणि अन्नधान्य देखील उपलब्ध नाही, जे आहे त्याचे दर सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. वीजेची उपलब्धता नसल्याने श्रीलंका अंधारात आहे. चीनच्या कर्जाच्या जाळ्यात श्रीलंका पुरता अडकलाय. श्रीलंका चीनच्या जाळ्यात इतका अडकला कि त्याने भारताला शह दण्यासाठी श्रीलंकेतील 'हंबनटोटा' हे बंदरही दिलं. मात्र श्रीलंकेतील अराजकाच्या स्थितीत सगळ्यात आधी भारतच धावून गेलाय.

महागाई आणि मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने श्रीलंकेची जनता रस्त्यावर उतरली आणि आंदोलनाने हिंसक वळण घेत पंतप्रधानांच्या घरासह अनेक मंत्र्यांच्या निवासस्थांवरच हल्ला केला. शेवटी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागलाय. पेट्रोल -डिझेल संपल्याने नागरिक संतप्त झाले होते. मात्र भारताने लागलीच पेट्रोल -डिझेलचे हजारो टन बॅरल भारतीय नौदलामार्फत पाठविण्यात आले. दूधासारखे पदार्थ इतके महाग झाले की सर्वसामान्यांना दूध देखील विकत घेता येईना. मात्र भारताने दूध पावडर, जीवनावश्यक औषधं आणि तांदळाचा मोठा पुरवठा श्रीलंकेला केलाय.

पण भारत पहिल्यांदा श्रीलंकेच्या मदतीला धावलाय असं नाही. ९० च्या दशकात देखील श्रीलंकेत गृहयुद्धासारखी स्थिती होती. श्रीलंकेत सिंहीली हा बहुसंख्यक असून बौद्ध धर्मीय आहे तर तमिळ तिथे अल्पसंख्यक आहेत. सिंहीली तमिळांना दुय्यम दर्जाची वागणूक देतात जाते असा आरोप तमिळांनी केला होता. त्यामुळे तमिल इलम म्हणजेच तमिळांसांठी स्वतंत्र देशाची मागणी जोर धरु लागली. १९८१-८२ पर्यंत छोट्या अनेक संघटना होत्या, मात्र त्यात लिट्टे म्हणजेच लिबरेशन ऑफ तमिळ टायगर इलम संघटना जहाल होती.

श्रीलंकेतील तमिळ आणि भारतीय तमिळ संस्कृती आणि धर्म यांच्या अनेक गोष्टी मिळत्या जुळत्या होत्या. त्यामुळे भारताने तमिळींच्या न्याय आणि हक्कांसाठी श्रीलंकन सरकारला नेहमी विनंती केली होती. त्यापूर्वी श्रीलंकेत सिंहींली आणि तमिळ हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातील लोक मारले जाऊ लागले. कितीतरी तमिळ श्रीलंकेतून भारतात तमिळनाडूमध्ये आश्रयाला आले. यामुळे पंतप्रधान राजीव गांधींवर तामिळनाडू राज्य सरकारकडुन यात लक्ष घालण्याचा दबाव वाढू लागला. पुढे लिट्टेच्या प्रमुख प्रभाकरनला राजीव गांधी भेटले होते आणि शांतात करारावर त्याने सहीदेखील केली होती. पण लिट्टे संघटनेला स्वतंत्र देश हवा होता, भारताला श्रीलंकेतील तमिळीबद्दल सहानूभूती होती, पण श्रीलंकेचे तुकडे व्हावे ही भूमिका नव्हती.

शांतता करारावर सह्या झाल्या त्यातील अटींनुसार राजीव गांधींनी १९८७ मध्ये शांती सेना श्रीलंकेत पाठवली होती. ज्यात फुटीरतावादी संघटना आपले शस्त्र भारतीय शांतीसैन्याला सोपवतील, असा करार होता. इतर संघटनांनी राजीव गांधींचं ऐकलं होतं. पण लिट्टे या संघटनेने मात्र ऐनवेळेसच धोका दिला होता. भारतीय शांतीसैन्य येईल आणि तमिळ फुटीरतावादी आपले श्स्त्र देतील, भारतीय सैन्य येताच तमिळ भागातून श्रीलंकन सैन्य निघून जाईल असं ठरलं होतं. त्याप्रमाणे भारतीय सैन्य पोहोचलं, श्रीलंकन सैनिकांनी प्रदेश सोडले, पण लिट्टेने भारतीय सैन्यावरच हल्ला केला, यात मोठ्या प्रमाणावर सैन्य मारलं गेलं. कारण भारतीय सैन्य युद्ध किंवा कोणत्याही मोहिमेच्या तयारीने आलं नव्हतं.

दरम्यान व्ही पी सिंहाचं सरकार पडलं आणि पुन्हा निवडणुका लागल्या त्याचबरोबर श्रीलंकेतही निवडणूका झाल्या आणि भारतविरोधी भुमिका असलेलं सरकार आलं. त्यांनी शांती सैन्य मागे घेण्यास सांगितलं.

राजीव गांधींवर श्रीलंकन नौदलातील सैन्याचा हल्ला -

पंतप्रधान राजीव गांधी ३० जुलै १९८७ ला श्रीलंकेच्या दौऱ्यावर होते. श्रीलंकन सैन्याकडून त्यांना मानवंदना दिली जात होती. श्रीलंकन नौदल तुकडीजवळून पंतप्रधान जात असताना गार्ड ऑफ ऑनर असलेल्या विजीथा रोहन विजेमुनी या सैनिकाने त्यांच्या रायफलच्या मागच्या बाजूने राजीव गांधींच्या मानेवर हल्ला केला, पण राजीव गांधींनी तो हल्ला चुकवला. सुदैवाने राजीव गांधींना मोठी दुखापत झाली नाही. विजेमुनीचं कोर्ट मार्शल करण्यात आलं आणि त्याला सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र भारतविरोधी मानसिकतेचं सरकार आल्यानंतर त्याने विजेमुनीची शिक्षा दोन वर्षातच रद्द केली होती. पुढे त्याने निवडणूकही लढविली होती.

राजीव गांधींच्या हत्येचा कट -

भारतात निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला होता, मात्र त्याचवेळी श्रीलंकेतील जाफराच्या जंगलात राजीव गांधींच्या हत्येचा कट शिजत होता. भारतातूल तामिळनाडू राज्यात राजीव गांधींच्या सभेत आत्मघाती बॉम्बस्फोट करण्याचं ठरलं. यासाठी दोन वेळा रेकी करण्यात आलीप्रभाकरनच्या अगदी जवळ असलेल्या चार लोकांनाच या कटाची माहिती होती. यातील शिवरासन च्या चुलत बहिणीची सुसाईड बॉम्बर म्हणून निवड करण्याता आली होती. राजीव गांधी चेन्नईहून श्रीपेरुंबुंदूर येथे प्रचार सभा घेणार ही माहिती वर्तमानपत्रातून मारेकऱ्यांना कळाली होती. मात्र राजीव गांधींना येण्यास बराच उशिर झाला होता. रात्री दहा वाजता ते राजीव गांधी स्टेजच्या दिशेने निघाले, तेव्हा अनेकजण त्यांना भेटत होते. महिलांची मोठी गर्दी होती. तेव्हा धनू ही सुसाईड बॉम्बर देखील राजीव गांधींच्या दिशेने निघाली. पण तिला एका सुरक्षारक्षकाने अडवलं. मात्र राजीव गांधींनी त्याला धनूला सोडण्यास सांगितलं. धनू राजीव गांधींच्या जवळ गेली पाया पडण्यास वाकली आणि तिने तिच्या कुर्त्यात असलेल्या बेल्टखालील बॉम्बचं बटन दाबलं. मोठा स्फोट झाला. यात राजीव गांधींसह १४ जणांचा जागीच मृत्यू झाला

राजीव गांधींनी संडे मासिकाला आपण सत्तेत आल्यावर श्रीलंकेत पुन्हा शांतीसैन्य पाठवणार असल्याचं सांगितलं होतं. यातूनच लिट्टेच्या प्रभाकरनने राजीव गांधींची हत्या केली होती.

राजीव गंधींची हत्या तमिळ टायगर्सनं केलीय हे सिद्ध होताच भारताने लिट्टे ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. यामुळे लिट्टेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारी सहानूभूती ओसरली. पुढे २००९ मध्ये श्रीलंकेनं प्रभाकरनचा खात्मा केला आणि श्रीलंकेतील गृहयुद्ध संपुष्टात आलं. एकंदरितच भारताचे श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी राजीव गांधींनी बलिदान दिलंय हे विसरता कामा नये

Web Title: Before Assasination Rajiv Gandhi Was Attacked By Sri Lankan Navy Soldier

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..