esakal | कर्नाटक राजकारणः अतृप्त आमदार अन्‌ भाजपचा गळ 
sakal

बोलून बातमी शोधा

 कर्नाटक राजकारणः अतृप्त आमदार अन्‌ भाजपचा गळ 

कर्नाटकची निवडणूक झाली अन्‌ जनतेत भांडणे लावून आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांमध्ये जनतेने भांडणे लावली. हे पहिल्यांदाच घडले, असे गंमतीने म्हटले गेले. परंतु, ती गंमत नव्हती तर सत्य होते. कारण, ही भांडणे अन्‌ धुसफूस अद्यापही संपलेली नाही. कॉंग्रेस-धजदचे संमिश्र सरकार किती दिवस टिकेल? हे छातीठोक सांगता येत नाही. कारण, मंत्रीपद न मिळालेल्या अतृप्त आमदारांसाठी भाजपने केव्हाच गळ टाकलाय' 

कर्नाटक राजकारणः अतृप्त आमदार अन्‌ भाजपचा गळ 

sakal_logo
By
संजय सूर्यवंशी

त्रिशंकू स्थिती होईल हे खरे परंतु, अवघे 37 आमदार असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील, असे निवडणुकीपूर्वी कोणी म्हटले असते, तर ते हास्यास्पद ठरले असते. परंतु, दुप्पटीहून अधिक अर्थात 79 आमदार असलेल्या कॉंग्रेसने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला अन्‌ पहिल्यांदाच कर्नाटकात वेगळ्या धाटणीचे सरकार अस्तित्वात आले. 104 आमदार असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे महाभारत घडले, हे यामागील उघड गुपीत आहे. आपले सरकार जरी अस्तित्वात आले तरी ते दोलायमान असणार हे संमिश्र सरकारमधील बहुतांशी ज्येष्ठ नेते ओळखून आहेत. कारण, शपथविधीदिनीच कोणाची नाराजी ओढवायला नको म्हणून त्या दिवशी फक्त मुख्यमंत्री कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर या दोघांनीच शपथ घेतली.

आमच्यात सारं काही आलबेलं आहे, असे भासवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. परंतु, बुधवारी मंत्रीपद न मिळाल्यामुळे पक्षातील नाराज गटाने स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला. बेळगाव जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी आणि दोनवेळचे मंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांच्याकडे पाहिले जाते. ऐन निवडणुकीत स्वतःच्या मतदार संघात प्रचार न करता निसटता विजय मिळविलेले जारकीहोळी बदामीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या प्रचारासाठी गेले अन्‌ त्यांना निवडूनही आणले. पण, आपल्यावरच अन्याय झाला, ही नाराजी त्यांनी बोलून दाखविली. ते एकटेच नव्हे तर कॉंग्रेसमधील डी. सुधाकर, बी. सी. पाटील, एम. बी. पाटील, शामनूर शिवशंकराप्पा, रोशन बेग, रामलिंग रेड्डी, तन्वीर सेठ हे जे पूर्वी मंत्री होते अशा बहुतांमशी मातब्बरांना कॉंग्रेसने मंत्री पदापासून डावलले आहे. तिकडे धजदमध्येही हीच स्थिती असून, त्यांनीही उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाडचे लिंगायत समाजाचे प्रभावी नेते बसवराज होरट्टी तसेच एच. विश्‍वनाथ व एम. सी. मुनगोळी यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नाराज गटाची स्वतंत्र फळी तयार होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. 

भाजप संधीच्या शोधात 
कॉंग्रेसने धजदला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे कळल्यानंतर भाजपच्या येडियुराप्पांनी अगतिकता दाखवत तातडीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, त्यांची अवस्था दिड दिवसाच्या गणपतीसारखी झाली अन्‌ 48 तासात त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. बहुमत सिद्ध होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देणे योग्य समजले. परंतु, त्यामागेही भाजपची खेळी होती. कारण, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याची एकदा संधी दिल्यानंतर ते सिद्ध न झाल्यास दुसऱ्यांदा बहुमतासाठी राज्यपालांकडे जाता येत नाही. सद्यस्थितीत बहुमतासाठी लागणारे 10 आमदार नाहीत, ते जेव्हा मिळतील तेव्हा बहुमत सिद्ध करता येईल, असे भाजपला वाटले. ती संधी आता हे कॉंग्रेस-धजदमधील नाराज आमदार देतील, ही आशा भाजपला आहे. त्यासाठीच भाजपने गळ टाकलेला असून त्यांच्या "ऑपरेशन कमळ'च्या जाळ्यात कोण कोण अडकणार हे पहावे लागेल. 

loading image