बैलहोंगलमध्ये बंडखोरीच्या पुनरावृत्तीचे सावट गडद...

जितेंद्र शिंदे
रविवार, 15 एप्रिल 2018

मलप्रभा नदीकाठावरचा मतदारसंघ बैलहोंगल परिचित आहे. सुरवातीला या ठिकाणी सातत्याने काँग्रेसचा वरचष्मा राहिला. त्यानंतर या मतदारसंघात धजदची जादू चालली. गेल्या तीन वेळेपासून भाजपची सत्ता असून डॉ. विश्‍वनाथ पाटील यांनी कजपमधून विजय मिळवला असला तरी ते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. शिवाय त्यांना उमेदवारीही जाहीर झाल्यामुळे माजी आमदार जगदीश मेटगूड यांनी बंडाचे निशाण फडकवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे बंडावरच काँग्रेसची मदार राहण्याची शक्‍यता आहे.

संभाव्य लढती
बैलहोंगल विधानसभा मतदारसंघात भाजप प्रमुख दावेदार आहे. येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. गत निवडणुकीत डॉ. पाटील यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक जनता पक्षातून (कजप) निवडणूक लढविली होती आणि ते विजयीही झाले होते. त्यांच्याविरोधात त्यावेळचे आमदार जगदीश मेटगूड यांचा पराभव त्यांनी केला होता. तर काँग्रेसकडून बसवराज कौजलगी उभे होते.

यंदाही अशीच स्थिती राहण्याची शक्‍यता आहे. सध्या भाजपने डॉ. पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे मेटगूड यांचे समर्थक नाराज आहेत. त्यांनी बंडाचे निशाणही फडकवले आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार महांतेश कौजलगी हे बाजी मारतात का, यावरही लोकांचे लक्ष आहे. गेल्या वेळी काटें की टक्‍कर झाली होती. त्यामध्ये केवळ तीन हजार मतांनी डॉ. पाटील विजयी झाले होते.

गतवेळच्या निवडणुकीतील मतदान
उमेदवार    पक्ष    मिळालेली मते
डॉ. विश्‍वनाथ पाटील    कजप    ४०,७०९
जगदीश मेटगूड    भाजप    ३७,०८८
बसवराज कौजलगी    काँग्रेस    ३६,०४२
 

टर्निंग पॉईंट
बैलहोंगल विधानसभा मतदारसंघात डॉ. विश्‍वनाथ पाटील, जगदीश मेटगूड यांच्यातील वैरत्वच टर्निंग पॉईंट ठरणार आहे. मेटगूड यांनी उगारलेले बंडाचे निशाण शांत करण्यात भाजपने यश मिळविल्यास भाजपला चांगला फायदा होऊ शकतो. पण, बंडखोरी कायम राहिल्यास त्याचा काँग्रेसलाही फायदा होऊ शकतो. डॉ. पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची, मेटगूड यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

इतिहास असा
या मतदारसंघात एच. व्ही. कौजलगी, डब्ल्यू. एस. कल्लूर, बी. ए. बोळशेट्टी हे काँग्रेसचे आमदार, बी. पी. अरवळ्ळी पाटील, आर. सी. बाळेकुंदरगी हे दोन काँग्रेसकडून, एस. एच. कौजलगी जनता पार्टी, शिवानंद कौजलगी दोनवेळा जनता दलाकडून, महांतेश कौजलगी संयुक्‍त जनता दलाकडून, जगदीश मेटगूड भाजपकडून दोन वेळा आणि डॉ. विश्‍वनाथ पाटील एकदा कजपकडून निवडून आले आहेत.

 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election