भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसचे आव्हान

अशोक परीट
गुरुवार, 10 मे 2018

निपाणी - चिक्कोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी व निपाणी या पाच तालुक्‍यांचा समावेश असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसने आव्हान दिले आहे.

निपाणी - चिक्कोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी व निपाणी या पाच तालुक्‍यांचा समावेश असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसने आव्हान दिले आहे. सध्या येथील पाच मतदारसंघ भाजपकडे, दोन काँग्रेसकडे तर एक बीएसआरकडे आहे. पण, आठपैकी सहा मतदारसंघ जिंकण्याचा दावा करून पालकमंत्री रमेश जारकीहोळी व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यूहरचना आखली आहे. पण, त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.

निपाणी, चिक्कोडी-सदलगा, हुक्केरी, यमकनमर्डी, रायबाग, चिक्कोडी, कुडची, कागवाड, अथणी मतदारसंघ चिक्‍कोडी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. आधी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ १९९४ नंतर आधी जनता दल आणि सध्या भाजपच्या वर्चस्वाखाली आहे. मात्र, खासदार काँग्रेसचे आहेत. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना पहिल्या टप्प्यात यश आले आहे. परंतु, कागवाड आणि रायबागतील मतविभागणीचा फटका नेमका कुणाला बसतो व अथणी, हुक्केरीत ताकद कुणाची वाढते हा प्रश्‍न आहे.

निपाणीत काँग्रेसने पुन्हा दबदबा निर्माण केला आहे. चिक्कोडी, कुडचीत काँग्रेस प्रभावी वाटत आहे. खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार वीरकुमार पाटील, आमदार विवेक पाटील आणि जारकीहोळी बंधूंनी यशस्वी प्रचार मोहिमा राबविल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार ते पृथ्वीराज चव्हाण यासारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. पक्षावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. त्यामुळे, काँग्रेसला अंतर्गत गटबाजीशी फारसे लढावे लागलेले नाही.

भाजपने नेहमीच्या आक्रमकतेला फाटा देऊन बेरजेचे राजकारण चालविले आहे. कागवाड, अथणीतील उमेदवार टिकेचे लक्ष्य बनले असले तरी त्यांचा प्रभाव कायम आहे. हुक्‍केरीत उमेश कत्तींचीही वट टिकून आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवरील भाजपची कामगिरी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा करिष्मा भाजपच्या वाटेतील अडथळा आहे. खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार महांतेश कवटगीमठ प्रचारात सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, बी. एस. येडियुराप्पा, नितीन गडकरी, पाशा पटेल यांच्यासह दिग्गजांच्या सभाही या विभागात झाल्या आहेत.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election