आयोडीनयुक्त मिठाचे फायदे विद्यार्थ्यांत रूजवावे; पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयोडीनयुक्त मिठाचे फायदे विद्यार्थ्यांत रूजवावे

आयोडीनयुक्त मिठाचे फायदे विद्यार्थ्यांत रूजवावे

नवी दिल्ली : आयोडीनयुक्त मिठाचा वापर अजूनही संपूर्ण भारतात होत नाही. या मिठाचा वापर केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम मेंदूवरही होतात. त्या विषयी आता केंद्र सरकारने जनजागृती केली पाहिजे. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरून आयोडीनयुक्त मिठाचे फायदे विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची गरज आहे, असे मत ‘आयोडिनमॅन’ म्हणून ओळख असलेले आणि नुकताच पद्मश्री किताब मिळालेले डॉ. चंद्रकांत पांडव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. पांडव यांना पद्मश्री बहाल करण्यात आला. त्याबद्दल ‘सकाळ’ने त्यांच्याशी दिल्लीत संवाद साधला. डॉ. पांडव हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे. कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी शिक्षणात प्रगती करीत दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेपर्यंत (एम्स) मजल मारली. प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत झालेल्या या माणसाने ‘एम्स’मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि चार दशके तिथे अध्ययन, अध्यापन आणि वैद्यकीय सेवा केली. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर त्यांनी संशोधन गेले आहे. देशाविदेशात त्यांच्या या कामाची दखल घेतली गेली. साठहून अधिक देशांचे मार्गदर्शक असलेल्या डॉ. पांडव यांचे साडेसहाशेहून अधिक संशोधन पेपर सादर केले आहेत. आपल्या संशोधनामुळे आतापर्यंत २१३ हून अधिक देशांना फायदा झाला आहे.

या संशोधनामुळे भूतान हा गलगंडमुक्त देश बनला. या देशासह चीनचेही आरोग्य विषयक धोरण लिहिल्याचा दावा डॉ. पांडव यांनी केला आहे. केंद्र सरकारने डॉ. पांडव यांच्या याच संशोधनाची दखल घेत त्यांना पद्मश्री बहाल केला. देशात ९३ टक्के लोक आयोडीनयुक्त मिठाचा वापर करतात. अजूनही सात टक्के भारतीय त्याचा वापर करीत नाही, याबद्दल बोलताना ते म्हणाले, राज्य सरकार स्वत: मीठ निर्माण करीत नाही. ते खासगी व्यापारी करतात. या लढ्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर योजना करण्याची गरज आहे. तसेच आयोडीनयुक्त मिठाचा वापर होतो की नाही, यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा असली पाहिजे.’’

‘‘वर्षभरात २१ ऑक्टोबर हा दिवस आयोडीनयुक्त मिठाच्या प्रचारासाठी ठेवला आहे. इतरवेळी त्यावर काही काम होत नाही. या मिठाच्या वापराबाबत जनजागर करण्याबरोबर शालेय अभ्यासक्रमात हा विषय आणला, तर त्याचा फार मोठा परिणाम दिसून येईल. त्यासाठी मी खूप प्रयत्न केला. सीबीएसई यांच्या पत्रव्यवहार केला, कार्यशाळा घेतल्या. त्यांनी काही भाग अभ्यासक्रमात घेतला. पण तेवढा पुरेसा नाही. आयोडीनयुक्त मिठाचा वापर मेंदूच्या वाढीसाठी आहे.’’

"मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यावर चांगले संस्कार करणारे माझे आई-वडील आणि माझ्या गुरूंना समर्पित आहे. भारत शंभर टक्के आयोडीनयुक्त मीठ वापर करणारा देश झालेला मला पाहायचे आहे. तीन वर्षांत हे काम करायचे आहे, त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिका, रशिया, युरोपीय देशाही या लढ्यात जोडले गेले आहेत. त्यामुळे अन्य देशातही या मिठाचा पूर्णपणे वापर सुरू होईल, अशी खात्री वाटते."

- डॉ. चंद्रकांत पांडव

loading image
go to top