
Saumitra Khan : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंदांचा अवतार; सौमित्र खान
कोलकता : पश्चिम बंगालमधील भाजपच्या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्वामी विवेकानंदांशी केल्याने पश्चिम बंगालमध्ये वाद ओढवून घेतला आहे. ‘मोदी हे स्वामी विवेकानंद याचा अवतार आहेत,’ असे विधान बांकुरा जिल्ह्यातील विष्णूपूरचे खासदार सौमित्र खान यांनी केले आहे. यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
भाजप नेत्यांकडून बंगालमधील महापुरुषांचा घोर अपमान केल्याचा हा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे, याकडे विरोधकांनी लक्ष वेधले आहे. पण खान यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगत भाजपने सावध भूमिका घेतली आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनीही खान यांच्या भूमिकेपासून दूर राहणेच पसंत केले आहे. खान यांचे वक्तव्य म्हणजे पक्षाची भूमिका नसल्याचा खुलासा भाजपने केला आहे. मोदी हे स्वामींचे केवळ भक्त आहेत, असे स्पष्ट करीत पक्षाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त विष्णूपूर येथे आयोजित कार्यक्रमात सौमित्र खान यांनी मोदींची तुलना विवेकानंद यांच्याशी केली. ते म्हणाले, की स्वामीजी आपल्यासाठी देवासमान आहेत. ते युवकांचे आदर्श आहेत. आईच्या निधनानंतरही मोदीजींनी स्वतःला देशासाठी समर्पित केले. यामुळे नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंद यांचा अवतार आहेत, असे मला वाटते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
स्वामीजींशी तुलना होऊ शकत नाही
खान यांच्या विधानावर बोलताना रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठाचे सरचिटणीस स्वामी सुविरानंद म्हणाले, ‘‘सप्तर्षींमधील सात ऋषींपैकी एक स्वामी विवेकानंद होते, असे रामकृष्ण स्वतः सांगत असत.
स्वामीजी हे शंकराचा अवतार होते आणि स्वामीजींसारखा दुसरा कोणीही नसेल, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे स्वामीजींशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यांच्यासंबंधी जे काही बोलले गेले ते संबंधित वक्त्यांच्या भावना आणि कल्पनाशक्ती याचा परिणाम आहे, असे माझे मला वाटते.’’