esakal | 'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

बोलून बातमी शोधा

'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत जाहीर केल्यानंतर भारत बायोटेकने देखील आपल्या कोव्हॅक्सिन लसीची किंमतही जाहीर केली होती. मात्र, भारत बायोटेकची ही लस सीरमच्या लसीपेक्षा दुप्पट किंमतीत उपलब्ध असणार होती. कालच सीरम इन्स्टिट्यूटचे CEO यांनी कोविशील्ड लशीची राज्यांसाठी असणारी किंमत कमी केल्यानंतर आता भारत बायोटेकने देखील कोव्हॅक्सिन लशीची किंमत कमी केली आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, देशात लस निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीने आपल्या लसीच्या किंमती जाहीर केल्या होत्या. येत्या १ मे पासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होत असून यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: सीरमच्या लशीची किंमत 100 रुपयांनी कमी; आदर पुनावालांनी केलं ट्विट

अशी असेल कोव्हॅक्सिनची नवी किंमत

दरम्यान, भारत बायोटेकनं याआधी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, कोव्हॅक्सिनची किंमत केंद्र सरकारसाठी १५० रुपये, राज्यांसाठी ६०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये प्रतिडोस इतकी असणार होती. मात्र, राज्यांसाठी असणारी ६०० रुपये ही किंमत कमी करत आता भारत बायोटेकने ही लस ४०० रुपयांमध्ये उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लस परदेशात ती १५ ते २० डॉलर प्रतिडोस इतक्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड लसीच्या तुलनेत ही किंमत जास्त आहे. कारण कोविशिल्ड राज्यांसाठी नव्या दरांनुसार ३०० रुपयांत तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपयांना मिळणार आहे.

सीरमनेही कमी केली किंमत

कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या लसीची किंमत जाहीर केली होती. त्यानुसार, सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये इतकी किंमत सीरमने निश्चित केली होती. त्याचबरोबर सीरमच्या उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित ५० टक्के लस या राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनाद्वारे सीरमने हे जाहीर केलं होतं. मात्र, आता या लशीची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारला ही लस ४०० रुपयांना मिळणार होती. मात्र, आता या लशीची प्रति डोस किंमत कमी करण्यात आली असून ती ३०० रुपये करण्यात आली आहे.