राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जून 2020

गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता शंकर सिंह वाघेला यांनी (NCP) राष्ट्रीय महासचिव पद आणि सक्रीय सदस्यतेचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली- गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता शंकर सिंह वाघेला यांनी (NCP) राष्ट्रीय महासचिव पद आणि सक्रीय सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महासचिव प्रफुल्ल पटेल यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी ट्विट करत आपण राजीनामा देत असल्याचं सार्वजनिकरित्या जाहीर केलं आहे. 

भाजपला मोठा झटका बसणार? या राज्यात सरकार वाचवण्याचे आव्हान
गेल्या काही काळात घडलेल्या राजकीय घटना आणि पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि तालुका-जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यातील असंतोषामुळे राजीनामा दिल्याचं वाघेला यांनी सांगितलं आहे. गेल्या काही काळापासून शंकर सिंह वाघेला हे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयंत पटेल उर्फ बोस्की यांची नियुक्ती झाल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

डॉ. मनमोहन सिंगाचा सल्ला पंतप्रधानांनी विनम्रतेना मानावा : राहुल गांधी
शरद पवार यांनी अहमदाबाद येथे येऊन त्यांना पक्षात घेतल्याबद्दल वाघेला यांनी पवार यांचे आभार मानले आहेत. माझ्या कार्यकाळादरम्यान गुजरातमधील अनेक जिल्हा आणि तालुक्यात पक्ष कार्यकर्ते वाढले असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच माझे अध्यक्षपद जाण्याने आणि सध्या राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि तालुका- जिल्ह्यातील नेत्यांमध्ये निराशा आहे, असा उल्लेख वाघेला यांनी पत्रात केला आहे. 

योगासनांचे महत्त्व वाढले
वाघेला यांचा राजकीय प्रवास रंजक राहिला आहे-

वाघेला आतापर्यंत पाच पक्षात राहिले आहेत. त्यांनी जनसंघमधून आपला राजकीय प्रवास सुरु केला होता. त्यानंतर बनलेल्या जनता पक्षातही ते सामिल झाले. जनता पक्ष फुटल्यानंतर ते भाजपमधील एक वरिष्ठ नेता म्हणून ओळखले जात होते. मात्र, 1996 साली त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली. 1996-97 मध्ये त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांनतर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसलाही रामराम केला. त्यानंतर त्यांनी जन विकल्प मोर्चा नावाचा नवा पक्ष स्थापन केला. त्यांनी या पक्षासोबत 2017 ची निवडणूक लढवली, पण त्यांचा एकही उमेदवार जिंकून आला नाही. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A big blow to the NCP shankar singh waghela resigned