esakal | केंद्राचा मोठा निर्णय; वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आयातीला परवानगी

बोलून बातमी शोधा

oxygen concentrators
केंद्राचा मोठा निर्णय; वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आयातीला परवानगी
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांची झालेली बिकट परिस्थिती पाहता केंद्र सरकारने शनिवारी एक महत्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, आता वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आयात करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने परदेशी व्यापार धोरण २०१५-२०२० मध्ये बदल केला आहे. देशातील जनतेला दिलासा मिळावा यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

३१ जुलैपर्यंत आहे परवानगी

केंद्र सरकारनं ३१ जुलैपर्यंत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आयातीला परवानगी दिली आहे. सरकारच्यावतीनं तीन महिन्यांसाठी पोस्ट, कुरिअर किंवा ई-कॉमर्स पोर्टल्सच्या सहाय्याने वैयक्तिक वापरासाठी गिफ्टच्या स्वरुपात ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या आयातीसाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, सरकारने कोरोना प्रतिबंधक लस, मेडिकल ऑक्सिजन त्याचबरोबर वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवरील करही माफ केला आहे.

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे फायदे

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विशेषतः घरांमध्ये आयसोलेट रुग्णांसाठी आणि ऑक्सिजनची कमतरता भासणाऱ्या रुग्णालयांमध्ये वापरता येऊ शकतं. आसपासच्या हवेतून ऑक्सिजन गोळा करणारं हे उपकरण विविध क्षमतेचं असतं. पोर्टेबल कॉन्सेंट्रेटर एका मिनिटात एक किंवा दोन लिटर ऑक्सिजन, मोठा कॉन्सेंट्रेटर एका मिनिटांत ५ ते १० लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करु शकतो.

भारताची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर!

भारताची आरोग्य व्यवस्थेवर या कोरोना महामारीचा खूपच वाईट परिणाम झाला आहे. देशात एकीकडे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधं उपलब्ध नाहीत. आज ४ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण बाधितांचा आकडा १,९१,६४,९६९ वर पोहोचला आहे.