
गुप्तेश्वर पांडेय यांनी आधीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र भाजपने पांडेय यांना तिकिट दिलं नव्हतं.
पटना - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. निवृत्तीच्या आधी पाच महिने पोलिस महासंचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुप्तेश्वर पांडेय यांचा राजकारणात प्रवेश निश्चित मानला जात आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकऱणात त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकदा चर्चेत आले होते. पटनामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर पोलिस महासंचालक पांडेय यांच्या आदेशानुसारच पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत आले होते. तेव्हा आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाइन केल्यानंतर गुप्तेश्वर पांडेय यांनी मुंबई पोलिसांसह BMC ला टार्गेट केलं होतं.
गुप्तेश्वर पांडेय हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2019 च्या जानेवारीमध्ये ते बिहारचे पोलिस महासंचालक बनले होते. त्यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत होता मात्र त्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. गुप्तेश्वर पांडेय यांनी आधीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र भाजपने पांडेय यांना तिकिट नाकारलं होतं.
2009 मध्ये गुप्तेश्वर पांडेय यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. तेव्हा बक्सर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणून लढवण्यासाठी ते इच्छूक होते. बक्सरचे भाजप खासदार लालमुनी चौबे यांना पक्ष पुन्हा तिकिट देणार नाही असं पांडेय यांना वाटत होतं. त्यामुळे पांडेय यांनी राजीनामा देऊन राजकारणात उतरण्यासाठी हालचाली केल्या. पण भाजपने लालमुनी यांनाच पुन्हा मैदानात उतरवलं. पोलिसातील नोकरी आणि लोकसभेच तिकिट दोन्ही हातातून गेल्यानंतर गुप्तेश्वर पांडे पुन्हा सेवेत येण्यासाठी प्रयत्न करत होते.
राजीनामा दिल्यानंतर 9 महिन्यांनी गुप्तेश्वर पांडेय यांनी बिहार सरकारला विनंती केली की पुन्हा सेवेत येण्याची इच्छा आहे. बिहारमध्ये नितिश कुमार यांच्या सरकारने त्यांचा अर्ज स्वीकारला आणि राजीनामा मागे दिला. 2009 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा पांडेय आयजी होते आणि 2019 मध्ये डीजीपी बनले होते. आता पुन्हा बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानं ते राजकारणात उतरणार अशी चर्चा रंगली आहे.