esakal | Bihar Election 2020: भाजप आता 'ड्राईव्हिंग सीट'वर
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Election 2020: भाजप आता 'ड्राईव्हिंग सीट'वर

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दल आघाडीने बाजी मारल्याचे चित्र असले तरी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचे नेतृत्व, प्रतिमा आणि राजकीय ताकद यात लक्षणीय घसरण झाली.

Bihar Election 2020: भाजप आता 'ड्राईव्हिंग सीट'वर

sakal_logo
By
अनंत बागाईतकर

सुरवातीस एकतर्फी वाटलेल्या आणि नंतर विलक्षण चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दल आघाडीने बाजी मारल्याचे चित्र असले तरी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचे नेतृत्व, प्रतिमा आणि राजकीय ताकद यात लक्षणीय घसरण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी वाढीव विश्‍वास व्यक्त करून भाजपच्या पदरात भरघोस जागांचे दान टाकले. 

दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा पक्ष अस्तंगत झाल्याची लक्षणे स्पष्ट झाली. उत्तर प्रदेशापाठोपाठ बिहार काबीज करण्याच्या टप्प्यावर भाजपने मजल मारल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले. देशाच्या आणि विशेषतः हिंदी पट्ट्यातील राजकारणात उत्तर प्रदेश व बिहारचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भाजपने उत्तर प्रदेश पूर्वीच काबीज केला होता परंतु त्यांना ते यश बिहारमध्ये प्राप्त झाले नव्हते. आता ती बाब त्यांच्या टप्प्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारचे राजकारण, राज्यकारभार आपल्या पद्धतीने चालविण्याची मनीषाही आता भाजपला पूर्ण करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता खऱ्या अर्थाने भाजप बिहारमध्ये ‘ड्रायव्हिंग सीट'' मध्ये म्हणजेच चालकाच्या आसनावर आरूढ झाला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वबळावर जिंकणे नीतिशकुमार यांना अशक्य
या निवडणुकीच्या निमित्ताने नीतिशकुमार यांच्या जनाधाराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. नीतिशकुमार हे स्वबळावर किंवा बिहारमधील जातीनिष्ठ राजकारणात केवळ ‘सुशासन बाबू’च्या किंवा स्वच्छ प्रतिमेच्या आधारे निवडणूक जिंकू शकत नाहीत हे स्पष्ट झाले. कधी भाजप किंवा गेल्या वेळेप्रमाणे लालूप्रसाद यांच्या सारख्या बळकट जनाधार असलेल्यांच्या मदतीनेच ते यशस्वी होऊ शकतात हे स्पष्ट झाले आहे. तीच बाब  दिवंगत रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षालाही लागू पडते आणि ते या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केले. भाजपकडे उच्चवर्णीय ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, वैश्‍य आणि शहरी समाज असा एक ठोस जनाधार निर्माण झाल्याचे जे चित्र विविध राज्यात पाहण्यास मिळते ते  बिहारमध्येही दिसले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजदने जनाधार टिकवून ठेवला
लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी त्यांनी बहुतांशाने त्यांचा जनाधार टिकवून ठेवल्याचे चित्र दिसून येते. २०१५ मध्ये राष्ट्रीय जनता दलास ८१ जागा मिळाल्या होत्या आणि मतमोजणीचा एकंदर कल पाहता या पक्षाने सत्तरच्या पुढे मजल मारलेली आहे. विशेष म्हणजे लालूप्रसाद यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी ज्या तडफेने प्रचार केला ते पाहता हे यश निश्‍चितच उल्लेखनीय मानावे लागेल. या तरुण आणि काहीशा अननुभवी व पोरसवद्या नेत्याचा मुकाबला मोदी आणि नीतिशकुमार यांच्यासारख्या मातब्बरांशी होता आणि म्हणूनच या विषम सामन्यातही या पक्षाला त्यांनी जे यश मिळवून दिले ते प्रशंसनीय आहे. 

भविकासाला प्राधान्य
या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारला तेजस्वी यादव यांच्यासारख्या एका तरुण व तडफदार आणि झुंजार नेत्याचा लाभ झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका मुलाखतीत त्यांनी संभाव्य पराभवाबाबत बोलताना हेच सांगितले की ते अजून खूप तरुण आहेत आणि वय त्यांच्या बाजूने असल्याने या निवडणुकीत पराभव झाला तरी ते चालू शकते. तेजस्वी यांनी जातपात किंवा सामाजिक न्यायापेक्षा रोजगार आणि आर्थिक न्याय अशा नव्या संकल्पनांच्या आधारे प्रचार केला आणि त्यामुळे त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला, असे निरीक्षण व्यक्त केले गेले. याचा अर्थ बिहारमध्ये सुप्त पातळीवर जातीचा प्रभाव असला तरी मतदार आता प्रगती व विकासालाही प्राधान्य देऊ लागल्याचे या निवडणुकीवरून स्पष्ट झाल्याचे मानले जाते.

loading image