बिहारींना कोरोनाची लस मोफत देऊ; भाजपकडून आश्‍वासनांचा पाऊस 

उज्ज्वलकुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

पुढील पाच वर्षांमध्ये तरुणांना १९ लाख नोकऱ्या, शेती मालाला किमान हमी भाव आणि राज्यातील प्रत्येकाला मोफत कोरोनाची लस आदी आश्‍वासने जाहीरनाम्यांतून देण्यात आली आहेत.

पाटणा- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पुढील पाच वर्षांमध्ये तरुणांना १९ लाख नोकऱ्या, शेती मालाला किमान हमी भाव आणि राज्यातील प्रत्येकाला मोफत कोरोनाची लस आदी आश्‍वासने जाहीरनाम्यांतून देण्यात आली आहेत.

‘बीजेपी है, तो भरोसा है’ या टॅगलाईनचा वापर करत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून केंद्राची जनधन योजना आणि उज्ज्वला यासारख्या योजनेचा देखील त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.  दरम्यान मोफत कोरोना लसीकरणाचे आश्‍वासन भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता असून सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या आश्‍वासनाला आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी) कोरोनावरील लस ही कुणा एका पक्षाची नसून ती संपूर्ण देशाची असल्याचे म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहार हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असे राज्य असून येथील लोकांना फसवता येणार नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षात आणणे शक्य आहे अशीच आश्‍वासने आम्ही जाहीरनाम्यांतून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, त्या सर्वांचीच अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्युतीकरण, सर्वांचे बँकेमध्ये नव्याने खाते उघडणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य आयटी हब होणार
पक्षाच्या ध्येयधोरणांचा समावेश असलेल्या व्हीजन डॉक्युमेंटच सीतारामन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. भाजप राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस उपलब्ध करून देणार असून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये तीन लाख शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आतापर्यंत माहिती तंत्रज्ञानापासून कोसो दूर असलेल्या बिहारला आयटी हब करण्याचा निर्धारही सीतारामन यांनी व्यक्त केला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य आश्‍वासने
    आरोग्य विभागात एक लाख लोकांना नोकऱ्या देणार
    महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ५० हजार कोटी
    मत्स्यपालनास प्रोत्साहन देणार
    धान, गव्हाची एमएसपीच्या दराने खरेदी
    शहर, ग्रामीण भागांत २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना घरे
    राज्यात पंधरा नवे प्रक्रिया उद्योग सुरू करणार

भाजपची पंचसूत्री
    शिक्षीत समाज, 
आत्मनिर्भर बिहार
    उद्योगआधारित सबळ समाज
    स्वस्थ समाज,
आत्मनिर्भर बिहार
    गावे, शहरे सर्वांचा विकास
    सशक्त कृषी समृद्ध शेतकरी

ती तरतूद रद्द करणार - तेजस्वी यादव
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या विशेष सरकारी कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा राज्य सरकारने केलेला नियम रद्दबातल ठरविण्याची घोषणा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज केली. आमच्या पक्षाचे सरकार सत्तेमध्ये येताच हा नियम रद्द करण्यात येईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election 2020 : Corona vaccine to Biharis free of cost assurances from BJP