esakal | Bihar Election 2020: समाजवादी, तरीही तडजोडप्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Election 2020: समाजवादी, तरीही तडजोडप्रिय

तडजोडीचे राजकारण करत सत्तेशी एकनिष्ठता हेच नितीशकुमार यांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी...

Bihar Election 2020: समाजवादी, तरीही तडजोडप्रिय

sakal_logo
By
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

समाजवादी विचारांचा पगडा असलेले, भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांशी मोट बांधलेल्या नितीशकुमार यांनी आघाडीचे, बेरजेचे राजकारण करताना शत्रूशी हातमिळवणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यातून विस्तव जात नव्हता, तरीही उभयतांनी आघाडीने बिहारात सत्ता संपादली. नितीशकुमार आणि लालूद्वयींनी एक लाख शिक्षकांच्या नियुक्‍त्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्‍टरांना चांगले राहणीमान, महिलांच्या साक्षरतेकडे लक्ष, गुन्हेगारी राज्य हा बिहारच्या माथ्यावरील शिक्का पुसण्यासाठी कसलेली कंबर, राज्यभर दारूबंदीचा निर्णयाने देशभर चर्चेचा विषय ठरले होते. त्याच लालूप्रसादांच्या पक्षाने त्यांचे पुत्र तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली २०२० मधील कोरोना काळातील निवडणुकीत नितीशकुमारांसमोर कडवे आव्हान उभे केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नितीशकुमार यांचे वडील कविराज रामलखनसिंह आयुर्वेदिक उपचार करायचे, ते स्वातंत्र्यसैनिक होते. आई परमेश्वरीदेवी गृहिणी होत्या. नितीशकुमारांचा जन्म १ मार्च १९५१ रोजी भक्तीहरपूरमध्ये झाला. तेथीलच गणेश हायस्कूलमध्ये शिकले. पुढे त्यांनी पाटणा सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एनआयटी, पाटणामधून इलेक्‍ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. राजकारणात उतरण्याआधी बिहार राज्य वीज मंडळात ते नोकरी करत होते. त्यांचा विवाह मंजुकुमारी सिन्हांशी झाला असून, उभयतांना मुलगा आहे. बिहारचे मुख्यमंत्रिपद नितीशकुमारांनी यापूर्वी सहावेळा भूषवलंय.

  डाव - प्रतिडाव
नितीशकुमारांनी १७ मे २०१४च्या निवडणुकीत पक्षाला बसलेल्या दणक्‍यानंतर जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रिपद सोडले होते. जितनराम मांझी मुख्यमंत्री झाले, पण राजकीय पेचामुळे फेब्रुवारी २०१५ मध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. १० एप्रिल २०१६ रोजी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. २६ जुलै २०१७ रोजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी मतभेदानंतर नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण त्याची शाई वाळायच्या आत, २४ तासांतच, २७ जुलै २०१७ रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकार्याने ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  केंद्रात मोठे योगदान
केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात नितीशकुमारांनी चांगली कामगिरी केली आहे. शेती, भूपृष्ठ वाहतूक खात्यांचा कारभार पाहिला. त्यांची रेल्वेमंत्रिपदाची कारकीर्द गाजली. रेल्वेच्या कारभारात व्यापक सुधारणा केल्या. २००२ मध्ये इंटरनेटद्वारे बुकिंगची सुविधा सुरू केली. तत्काळ योजना सुरू केली. तथापि, गैसल येथील रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारत त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 

 मुलींना सायकली, दारूबंदी
नितीशकुमारांनी आपल्या कारकिर्दीत मुलींना सायकली वाटण्याचा उपक्रम सुरू केला, जेणेकरून शाळा सोडण्याचे प्रमाण घटेल. त्याचा अपेक्षित परिणाम मिळाला, मुलींच्या शिक्षणात सुधारणा झाली. २०१०च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने भाजपच्या सहकार्याने निवडणूक लढवली आणि २०६ जागा पटकावल्या. त्यावेळी महिला, युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. कोणताही रक्तपात, हिंसाचार न होता निवडणूक झाली. १७ मे २०१४ रोजी नितीशकुमारांनी पक्षाच्या लोकसभेतील जागा वीसवरून दोनवर आल्याने राजीनामा दिला. मग जितनराम मांझी मुख्यमंत्री झाले.

 नितीश-लालूप्रसाद आघाडी
बिहार विधानसभेची २०१५ मध्ये झालेली निवडणूक नितीशकुमारांना आव्हानात्मक होती. त्यांनी जनता दलाची (संयुक्त) मोट राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी बांधत महागठबंधन साकारले. त्यांच्या आघाडीला १७८ जागा मिळाल्या, राष्ट्रीय जनता दलाला ८०, तर जनता दलाला (संयुक्त) ७१ जागा मिळाल्या. २० नोव्हेंबर २०१५ रोजी नितीशकुमार पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदी झाले, तेजस्वी पहिल्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले. इंडियन पोलिटिकल ॲक्‍शन कमिटीने (आय-पीएसी) त्याचे व्यवस्थापन पाहिले होते. त्यावेळी त्यांनी ‘हर घर दस्तक’ अशी मोहीम राबवली होती. 

नितीशकुमारांची वाटचाल 
    १९७१ : समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी युवाजन सभेच्या युवकांच्या दलात सामील.
    १९७४ : ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत दाखल, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये अटक.
    १९७५ : आणीबाणी काळात अटक.
    १९७७ : जनता पक्षाच्यावतीने पहिल्यांदा बिहार विधानसभेची निवडणूक लढवली. 
    १९८५-१९८९ : बिहार विधानसभेचे सदस्य. 
    १९८७-१९८८ : लोकदलाचे बिहारातील अध्यक्ष. 
    १९९१ : दुसऱ्यांदा लोकसभेवर निवड.
    १९९८ : चौथ्यांदा लोकसभेचे (बाराव्या) सदस्य. 
    १९९९-२००० : केंद्रीय कृषी मंत्री
    २००० : नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री. 
    २०००-२००१ : केंद्रीय कृषीमंत्री. 
    २००५-२०१० : बिहारचे मुख्यमंत्री. 
    २०१० ते २०२० : नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री.

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

loading image