बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

काँग्रेसने 70 जागा लढवल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडून 70 प्रचारसभाही झाल्या नाहीत. ज्या लोकांना बिहार माहीत नाही, त्यांच्याकडे प्रचाराची धुरा देण्यात आली होती.

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या पराभवानंतर आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी काँग्रेस महाआघाडीसाठी घातक सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने निवडणुकीत 70 उमेदवार उतरवले होते. त्यांच्या 70 प्रचारसभाही झाल्या नाहीत. निवडणूक जेव्हा शिगेला पोहोचली होती, तेव्हा राहुल गांधी बहीण प्रियांकासह सिमल्यात सहलीला गेले होते. अशा पद्धतीने पक्षाचे काम चालते का ? असा सवाल त्यांनी केला. 

निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर पाच दिवसांनंतर आरजेडीकडून पहिल्यांदाच काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणूक लढत आहे, त्यामुळे भाजपलाच जास्त फायदा होत आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

हेही वाचा-Bihar Election 2020 : काँग्रेस करणार पराभवाचे विश्लेषण

काँग्रेसने 70 जागा लढवल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडून 70 प्रचारसभाही झाल्या नाहीत. ज्या लोकांना बिहार माहीत नाही, त्यांच्याकडे प्रचाराची धुरा देण्यात आली होती. राहुल गांधी तीन दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी तर आल्याही नाहीत. 

पू्र्वीपासून काँग्रेसचा जोर हा जास्तीत जास्त जागा लढण्याचा आहे. पण ते ज्या पद्धतीने निवडणूक लढवतात, त्यामुळे त्यांच्या सहयोगी पक्षांचेच नुकसान होते. काँग्रेसने आपल्या रणनीतिवर विचार करायला हवा, असे तिवारी म्हणाले. पहिल्यांदाच आरजेडीने पराभवास काँग्रेसला जबाबदार धरले आहे. 

हेही वाचा- राम मंदिर उभारणीला होणार उशीर; बांधकामात येतायत अडचणी

दरम्यान, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी हे नॉन सिरियस पर्यटक राजकीय नेते आहेत, असे तिवारी म्हणतात. तिवारी हे तर राहुल गांधींना ओबामांपेक्षा चांगलं ओळखत आहेत. तरीही काँग्रेस गप्प का आहे ? 

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 110 जागांवर विजय मिळाला आहे. आरजेडीला 75 जागा मिळाल्या आहेत. यंदा काँग्रेसने 70 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना केवळ 19 जागांवर विजय मिळाला. महाआघाडीत काँग्रेसची सर्वांत खराब कामगिरी राहिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election 2020 rjd Leader Shivanand Tiwari slams on Rahul Gandhi for On Picnic in Shimla