esakal | Bihar Election 2020: शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मते
sakal

बोलून बातमी शोधा

ncp-shivsena

राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२२ टक्केच मते मिळाली आहेत. तर शिवसेनेला त्याहून कमी म्हणजे ०.०४ टक्के मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत रक्कम संकटात आहे.

Bihar Election 2020: शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मते

sakal_logo
By
अजय बुवा - सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - महाराष्ट्रात महाआघाडीमधील महत्त्वाचे पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सीमोल्लंघनाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही पक्षांना नोटा (उमेदवारांना मत नाकारण्याचा पर्याय) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२२ टक्केच मते मिळाली आहेत. तर शिवसेनेला त्याहून कमी म्हणजे ०.०४ टक्के मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत रक्कम संकटात आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही बड्या पक्षांना बिहारमध्ये यश हाती लागले नाहीच, परंतु मिळालेली मतेही अर्ध्या टक्क्याहून कमी आहे. उलट नोटा पर्यायामध्ये दीड टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहेत.  नोटा (नन ऑफ द अबोव्ह- वरील पैकी एकाही उमेदवाराला नाही) या उमेदवारांना नाकारणाऱ्या पर्यायाचा मतदारांनी बऱ्यापैकी वापर केला असून नोटासाठी १.७१ टक्के मतदान मतदारांनी केले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेने बिहारमध्ये ४० ते ५० जागा लढविण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात २३ जागांवर उमेदवार दिले होते. तर प्रारंभी महागठबंधनमध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही सर्व जागांवर उमेदवार देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात या पक्षाने १४५ उमेदवार मैदानात उतरवले होते.     

एमआयएम, बसपला कमी मते
अर्थात, फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे तर, लक्षणीय यश मिळविणाऱ्या एमआयएम, डाव्या पक्षांनाही ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली आहेत. पाच जागा जिंकण्याची शक्यता असलेल्या एमआयएमच्या मतांची टक्केवारी १.२४ टक्के आहे. तर बिहार विधानसभेत एका जागेने खाते उघडणाऱ्या बहुजन समाज पक्षालाही १.६२ टक्के मते आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ०.७२ टक्के मते बिहारी मतदारांनी दिली आहेत. फॉरवर्ड ब्लॉक ०.०१ टक्का, धर्मनिरपेक्ष जनता दल ०.०४ टक्का आणि झारखंड मुक्ती मोर्चा ०.०८ टक्का अशी या पक्षांची मतांची टक्केवारी आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा