मृत्यूचा खेळ खेळून मते मिळत नाहीत; PM मोदींची विरोधकांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

स्वत: पंतप्रधान मोदी सोशल डिस्टन्सिंग पाळा असं सांगत असताना कार्यक्रमात मात्र कोरोना आहे की नाही याचा विसर पडल्याचं चित्र दिसत होतं.

नवी दिल्ली - बिहारमध्ये एनडीएचा विजय झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी आज भाजपचे नेते दिल्लीतील मुख्यालयात एकत्र आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जवळपास 40 मिनिटांच्या भाषणात मोदींनी बिहारमधील निवडणुकीवरून विरोधकांवर टीका केली. तसंच घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवरही हल्लाबोल केला. राजकीय हत्येचा उल्लेख करत विरोधकांना धारेवर धरलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मृत्यूचा खेळ खेळून कोणाला मत मिळत नाही, भिंतीवर लिहिलेले शब्द वाचा, बिहारनंतर आता बंगालमध्ये मे 2021 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. असं म्हणत मोदींनी पश्चिम बंगालमधील हत्येवरून नाव न घेता टीका केली. भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा हे उपस्थित होते. 

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन केलं जात असताना भाजपच्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. स्वत: पंतप्रधान मोदी सोशल डिस्टन्सिंग पाळा असं सांगत असताना कार्यक्रमात मात्र कोरोना आहे की नाही याचा विसर पडल्याचं चित्र दिसत होतं. आजच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं होतं की, दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं कारण सुपर स्प्रेडर इव्हेंट आहेत जिथं लोक मोठ्या संख्येनं गर्दी करतात आणि कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. 

Live Updates -

- निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला यासाठी नव्हे तर लोकशाहीच्या या उत्सवाला सर्वांनी मिळू उत्साहाने साजरा केला यासाठी
- काही भागात निवडणूक झाली असली तरी काल सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्हीकडे सर्वांचे लक्ष होते
- लोकशाहीसाठी भारताची जी श्रद्धा आहे ती जगात कुठंही नाही
- निवडणुकीची प्रक्रिया भारतासाठी अभिमानाची बाब
- निवडणूक यशस्वी आणि शांततेत पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोग, सुरक्षा दल, प्रशासनाचे अभिनंदन
- पूर्वी मतांची लूट झाली, पुन्हा मतमोजणी होणार असं ऐकायला मिळायचं पण आता मते वाढली, टक्केवारी वाढली असं ऐकायला मिळतं. 
- कोरोनाच्या संकटात निवडणूक सोपी नव्हती पण तरीही निवडणूक आय़ोगाने योग्य नियोजन करून जगाला भारताची ताकद दाखवून दिली.
- भाजपला, एनडीएला मोठं बहुमत दिलं, लाखो कार्यकर्त्यांचे जितके अभिनंदन करावे तितके कमी
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे कौशल्य आणि रणनिती याचा हा निकाल आहे
- भाजपने देशाच्या पूर्व पश्चिम भागात, कच्छच्या वाळवंटातही निवडणूक जिंकली
- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही विजय मिळाला
- दक्षिणेत कर्नाटक, तेलंगणामध्येही यश
- लडाख, दीव, दमणमध्येही भाजपचा जय
- भाजप एकमेव पक्ष ज्याने पूर्ण देशात विजयाचा झेंडा फडकावला
 

संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह भाजपच्या मुख्यालयात दाखल

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा भाजपच्या मुख्यालयात दाखल

भाजप मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष; बिहारमध्ये मिळालेल्या विजयाचे सेलिब्रेशन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election nda victory pm modi speech  delhi bjp congress