Bihar Election 2020: राजकारणात 'तेजस्वी' स्थान अधोरेखित 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

तेजस्वी यांनी विधानसभा निवडणूकीद्वारे राजकारणात स्वतःचे स्थान भक्कमपणे निर्माण केले. अंतिम निकाल काहीही लागला आणि सरकार कुणाचेही बनले तरी तेजस्वी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

बिहारचे एकेकाळचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या छायेतून बाहेर पडत त्यांचे पुत्र तेजस्वी यांनी विधानसभा निवडणूकीद्वारे राजकारणात स्वतःचे स्थान भक्कमपणे निर्माण केले. अंतिम निकाल काहीही लागला आणि सरकार कुणाचेही बनले तरी तेजस्वी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

निवडणूकीचे पडघम वाजू लागले तेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रस्थापित चेहऱ्यांसमोर तेजस्वी इतके कडवे आव्हान निर्माण करतील असे कुणालाही वाटले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या आव्हानाला तेजस्वी समर्थपणे सामोरे गेले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रचार काळात दिवसागणिक तेजस्वी यांचे पाऊल पुढेच पडले. तेजस्वी हे नितीश कुमार यांना पर्याय ठरणार का असा प्रश्न विचारला जात होता. सत्ताधारी जदयू किंवा भाजप नेते तेजस्वी यांच्या आव्हानाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी त्यांना कमीच लेखत होते. त्यांच्यासारखा नवखा तरुण आपला प्रतिस्पर्धी असणे पथ्यावरच पडणार आहे, असा त्यांचा सूर होता.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर महाआघाडीची धुरा तेजस्वी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती यशस्वीरित्या पेलून दाखविली. जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे मुकेश साहनी, उपेंद्र कुशवाह आणि जीतनराम मांझी साथ सोडून गेले होते. या धक्क्यांमधून सावरत तेजस्वी यांनी डाव्या पक्षांशी समन्वय साधला. २० जागी उमेदवार उभे करून काँग्रेसला २० ठिकाणीच आघाडी घेता आली. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जागा लढविण्याच्या काँग्रेसच्या हट्टामुळे तेजस्वी यांची मोहिम कुठेतरी कमकुवत झाली. असे असले तरी दहा लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन देत तेजस्वीने रणधुमाळीला कलाटणी दिली. यानंतर त्यांच्या सभांना होणारी गर्दी वाढू लागली. मतदारांचा उत्साह आणि पाठिंबा त्यांचे मनोधैर्य उंचावणारा ठरला. अर्थात आतापर्यंतचे निकाल पाहता या गर्दीचे मतांमध्ये पूर्णपणे रुपांतर होऊ शकले नाही असे दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election Tejaswi Yadav created his own identity.