Bihar Politics : नितीशकुमारांच्या जेडीयू पक्षाच्या आमदारांशी गाठीभेठी

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या जेडीयू पक्षाच्या आमदारांची आणि खासदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumar Sakal

नवी दिल्ली/पाटणा - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या जेडीयू पक्षाच्या आमदारांची आणि खासदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये देखील जेडीयू आघाडीत हालचाली होऊ शकतात, असा भाजपच्या नेत्यांकडून दावा केला जात आहे.

दरम्यान, राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोदी सरकार बिहारमधील महाआघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. बिहारमध्ये नाक खुपसू नये आणि महाआघाडीच्या शक्तीपुढे त्यांची डाळ शिजणार नाही, असेही ते म्हणाले. मोदी सरकार आल्यानंतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात कुचराई झाली आहे आणि ही बाब संघाचे धोरण लागू करण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बिहारमध्ये विरोधी पक्षात फोडाफोडी हेाऊ शकते, अशी कुणकूण मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लागली असून त्यानुसार नितीशकुमार खबरदारी घेत आहेत. पाटण्यात २३ जून रोजी विरोधी पक्षाची बैठक झाल्यानंतर २९ जून रोजी गृहमंत्री अमित शहांचा दौरा झाला होता.

या दौऱ्यानंतर नितीशकुमार यांनी प्रत्येक आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यानुसार ते आता खासदारांना देखील भेटणार आहेत. काही अडचणी असल्यास आमदारांनी थेट आपल्याशी बोलावे, असा संदेश नितीशकुमार यांनी पक्षातील आमदारांना दिला आहे.

यादरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले, की महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता बिहारचे नितीशकुमार सरकार हादरले आहे. बिहारच्या सत्ताधारी आघाडीत देखील पळापळ होऊ शकते, असे भाकित त्यांनी केले. पूर्वी नितीशकुमार यांना भेटण्यासाठी वाट पाहावी लागायची, मात्र आता ते सर्वांना सातत्याने भेटत असून संपर्कात राहत आहेत.

खासदार फोडण्याचे प्रयत्न?

भाजपला बिहारमध्ये लोजप वगळता मोठा घटक पक्ष नाही. लोजपचे सहा खासदार आहेत. जेडीयूचे १६ खासदार आहेत. या खासदारांना फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. लोजपचे खासदार चिराग पासवान यांनी जेडीयू फुटीच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी एकेकाळी नितीशकुमार यांचे विश्वासू असलेले जेडीयूचे नेते आरसीपी सिंग यांनी भाजपत प्रवेश केला आहे. यासह जेडीयूचे काही नेते व खासदारही संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

तेजस्वी यांच्यावर आरोपपत्र

सीबीआयने रेल्वेतील नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या एका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तेजस्वी यांच्या अगोदर लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

रेल्वेतील नोकरीच्या बदल्यात जमिनीतून मिळालेल्या पैशातून दिल्लीतील न्यू फ्रेंडस कॉलनीत तेजस्वी यादव यांच्यासाठी बंगला खरेदी करण्यात आला. हा बंगला एका कंपनीने खरेदी केला आणि त्यानंतर तो तेजस्वी यादव यांच्या नावावर करण्यात आला.

भाजपचे कोणतेही राजकीय नाट्य महाराष्ट्रात जास्त काळ चालणार नाही. महाराष्ट्रात शरद पवार असून त्यांना मागे टाकणे भाजपला कठीण जाणार आहे. बिहारमध्ये भाजप विरोधी पक्षात तोडफोड करू इच्छित आहे. परंतु त्यात ते यशस्वी होणार नाहीत.

भाजपने नीतिमत्तेला सोडून काम केले आहे. मोदी यांची नौका बुडत आहे. त्या भितीपोटीच विरोधकांत मोडतोड केली जात आहे. भाजपला शरद पवार यांच्या शक्तीचा अंदाज नाही. भाजप अपयशी ठरेल. शरद पवार यांचा विजय होईल आणि भाजप चारीमुंड्या चित होईल.

- लालूप्रसाद यादव, राजद नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com