Bihar Politics : विजयकुमार सिन्हा यांची खुर्ची धोक्यात

बिहारमध्ये ‘महाआघाडी’ने मांडला अविश्वास ठराव
Bihar Politics Vijayakumar Sinha Maha Aghadi no-confidence motion
Bihar Politics Vijayakumar Sinha Maha Aghadi no-confidence motion sakal

पाटणा : बिहारमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांची खुर्ची आता धोक्यात आली आहे. सत्ताधारी महाआघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. सिन्हा हे भाजपचे आमदार आहेत. विधिमंडळ सचिवालयास सादर केलेल्या याबाबतच्या नोटिशीवर महाआघाडीतील विविध घटक पक्षांच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे संयुक्त जनता दलाने (जेडीयू) म्हटले आहे. दुसरीकडे पत्रकारांनी याबाबत विचारले असता सिन्हा यांनी त्याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे. मी सध्या घटनात्मक पदावर असल्याने बाहेर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सलग आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. विधिमंडळामध्ये नितीश सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार असून त्याचवेळी सिन्हा यांच्याबाबतच्या ठरावावर फैसला होऊ शकतो, असे ‘जेडीयू’चे नेते विजयकुमार चौधरी यांनी स्पष्ट केले. बिहार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २४ ते २५ ऑगस्ट या काळामध्ये होईल. नितीश सरकारला २४ रोजीच बहुमत सिद्ध करावे लागेल. नियमानुसार विधिमंडळामध्ये एक वेगळा ठराव संमत करून विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटविता येऊ शकते, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.

तेजप्रताप यांना हवे आरोग्यमंत्रालय

सत्तास्थापनेनंतर बिहारमध्ये आता मलाईदार खात्यांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नितीश आणि तेजस्वी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून त्यासाठी अनेक बड्या नेत्यांनी लॉबिंग करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी आरोग्य मंत्रालय मागितले आहे. याआधी सर्वप्रथम मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य खातेच सोपविण्यात आले होते.

सुशील मोदींच्या आरोपांची खिल्ली

‘नितीशकुमार यांना उपराष्ट्रपती व्हायचे होते, त्यांना ही संधी न मिळाल्यानेच त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतचे (एनडीए) संबंध तोडल्याचा,’ आरोप भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या या आरोपाची नितीश यांनी आज खिल्ली उडविली. याबाबत पत्रकारांनी विचारले असता नितीश म्हणाले की, ‘‘ यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो? माझी उपराष्ट्रपती व्हायची इच्छा नव्हती किंवा मी तसा दावा देखील केला नव्हता. सुशील मोदी यांनी माझ्याबाबत अशाप्रकारचे वक्तव्य केल्याचे मलाच आश्चर्य वाटते. त्यांनी असे बोलण्याआधी विचार करायला हवा होता. माझ्यावर आरोप केल्याने काही लोकांचे कल्याण होत असेल तर माझा त्याला आक्षेप नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com